Breaking News

पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंदा टिश्यु पेपर गणरायाची निर्मिती शाडू आणि पीओपीच्या गणरायाच्या मुर्तीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी

ग्लोबल वार्मिंग आणि समुद्र, नदी-नाल्यांमधील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या पर्यांवरणाच्या रक्षणासाठी विर्ले-पार्ले येथील संकेश रेणूके यांनी आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी माफक दरात टिश्यू पेपरपासून गणरायाची निर्मिती करून त्यास हातभार लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

विर्ले-पार्ले येथील शिक्षक संकेश रेणूके यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेत मुंबई सारख्या शहरात गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी टिश्यू पेपरपासून गणरायाची निर्मिती करण्याचे शिक्षण घेतले. तसेच ही कला इतरही नव्या उत्साही कलाकारांना यावी याकरिता ती शिकविण्यास सुरुवात केली.

मागील चार वर्षापासून प्रत्येक गणेशोत्सवाच्या काळात संकेश रेणूके हे किमान ८ ते १० टिश्यू पेपरपासून गणरायाच्या मुर्त्या तयार करतात. त्यासाठी टिश्यू पेपर, झाडाचा डिंक, गुलाल आणि पाण्याचा वापर करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या शाडू, पीओपीच्या मुर्तीपेक्षा ही मुर्ती कमी खर्चात तयार करण्यात येते.

बाजारात शाडू आणि पीओपीपासून बनविलेली गणरायाची दोन फुटाची मुर्ती साधारणतः  ७ ते ८ हजार रूपयांपर्यंत मिळते. तर टिश्यू पेपरपासून तयार करण्यात आलेली इतक्याच आकाराची मुर्ती ४ ते ६ हजार रूपयांपर्यंत उपलब्ध होत असल्याचे मुर्तीकार रेणूके यांनी सांगितले.

या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचा बचाव होण्यास मदत होते. तसेच या मुर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर ओला झालेला कागदाचा लगद्याचा पुर्नवापर करता येतो. त्यामुळे पाण्यात कोणत्याही पध्दतीचे प्रदुषण होत नाही. दरवर्षी साधारणतः ८ ते १० गणपतीच्या मुर्त्या मी तयार करून देतो. त्याच्यावर वातावरणाचा कोणताही परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र आगामी वर्षापासून कागदापासून बनविलेली मुर्ती गणेशोस्तवाच्या काळात वापरावी याकरिता आपण जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *