Breaking News

कॉम्रेड कुमार शिराळकर : एक मौल्यवान अष्टपैलू हिरा शिराळकर यांच्या निधनानिमित्त कॉ. डॉ. अशोक ढवळे लिहिलेला खास लेख

कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या जाण्याने केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नव्हे, तर महाराष्ट्राच्या समग्र डाव्या आणि परिवर्तनवादी चळवळीने एक मौल्यवान अष्टपैलू हिरा गमावला आहे. गेल्या ४० वर्षांचा एक सच्चा कॉम्रेड आणि मित्र मी गमावला आहे.

वर्गसंघर्षातून क्रांतिकार्याकडे

विधायक कार्यातून क्रांतिकारक कार्याकडे झालेल्या कुमार यांच्या प्रवासातून त्यांची संवेदनशीलता आणि अन्याय्य व्यवस्थेबद्दलची चीड हे दोन्ही गुण व्यक्त झाले. देशभरातील अनेक कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणे इंजिनियर झाल्यावर कुमार यांनी सुखासीन जीवन लाथाडले आणि समाजातील सर्वात पिचलेल्या आदिवासी व दलित शेतमजुरांमध्ये जाऊन ते राहिले. त्यांच्यावर होणाऱ्या भयानक अन्याय-अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना संघटित केले.

१९७० साली बाबा आमटे यांच्या श्रमिक विद्यापीठातून कुमार यांचा जो वैचारिक प्रवास सुरू झाला, त्याची परिणती युवक क्रांती दल, मागोवा गट, श्रमिक संघटना हे टप्पे गाठत १९८२ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात झाली. नंदुरबार जिल्ह्यातील धनदांडगे जमीनदार विरुद्ध आदिवासी-दलित शेतमजूर अशा अटीतटीच्या वर्गसंघर्षाच्या प्रत्यक्ष अनुभवातून कुमार मार्क्सवादाकडे आकर्षित झाले. या संघर्षात स्वतः कुमारवर आणि त्यांच्या अनेक साथीदारांवर जमीनदारांचे प्राणघातक हल्ले झाले. अशाच एका हल्ल्यात कुमार यांचा एक कान निकामी झाला. अमानुष शेल्टी हत्याकांडात जयसिंग माळी त्यांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचले.

वर्गसंघर्षाच्या त्याच अनुभवामुळे आणि मार्क्सवादाच्या प्रभावामुळे, एका स्थानिक संघटनेपुरते मर्यादित न राहता डाव्या चळवळीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा महत्त्वाचा निर्णय कुमार शिराळकर, जयसिंग माळी, नथू साळवे, सुधीर बेडेकर आणि त्यांच्या अनेक साथीदारांनी अतिशय डोळसपणे आणि विचारपूर्वक घेतला. श्रमिक संघटनेत या निर्णयावर एकमत होऊ शकले नाही, तरीही कुमार व त्यांचे साथीदार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पक्षाचे पहिले महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. एस. वाय. कोल्हटकर यांनी कुमार व त्यांच्या साथीदारांच्या पक्ष प्रवेशात सतत मोलाचे राजकीय-वैचारिक मार्गदर्शन केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील योगदान

तो काळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चढत्या कमानीचा काळ होता. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने आणीबाणीला आणि ती आणणाऱ्या इंदिरा कॉँग्रेसला झिडकारले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संसदेतील प्रतिनिधित्व लक्षणीय प्रमाणात वाढले होते. त्यानंतर लगेच पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि पुन्हा केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीची सरकारे स्थानापन्न झाली होती. डाव्या चळवळीची तशीच चढती कमान पुन्हा येईल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय किसान सभा आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या पूर्वीच स्थापन झालेल्या जनसंघटनांच्या सोबत, १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या तीन नवीन जनसंघटना राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यातील अखिल भारतीय शेतमजूर युनियन स्थापन करण्याचा निर्णय साहजिकच कुमार यांच्या विशेष आवडीचा होता.

कुमार पक्षात आल्यानंतर लगेच १९८३ साली शेल्टीचे निर्घृण आदिवासी हत्याकांड घडले. धनदांडग्या जमीनदारांच्या ‘पुरुषोत्तम सेने’ने पाच आदिवासी शेतमजुरांना ठार मारले. त्याचा जळजळीत निषेध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराखाली मुंबईत एक जबरदस्त मोर्चा विधानसभेवर निघाला. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार अशा जिल्ह्यांतून हजारो आदिवासींना पक्षाने या मोर्चासाठी संघटित केले. कॉम्रेडस् एस. वाय. कोल्हटकर, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर, प्रभाकर संझगिरी, डॉ. ए. बी. सावंत, नरेंद्र मालुसरे हे सर्व तत्कालीन पक्ष नेतृत्व कुमार यांच्यासोबत त्या मोर्चाच्या अग्रभागी होते. पक्षाचे दोन्ही आदिवासी आमदार लहानू कोम आणि जे. पी. गावीत यांनी या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडली आणि या हत्याकांडाचे सूत्रधार असलेले आमदार पी. के. पाटील यांच्यावर तर विधानसभेतच लहानू कोम खुर्ची घेऊन धावून गेले.

१९८२ मध्ये महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा)चे स्थापना राज्य अधिवेशन शहादा येथे झाले. पुढील तीन दशके कुमार यांची या संघटनेचे राज्य सरचिटणीस व पुढे राज्य अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय सहसचिव म्हणून निवड झाली. शेतमजूर युनियनची महाराष्ट्रात बांधणी करण्यासाठी, शेतमजुरांच्या अनेकविध आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर लढे उभारण्यासाठी कुमार यांनी जे अथक परिश्रम केले ते आपण सर्वांनी पाहिले आहेत, अनुभवले आहेत.

२००४-०८ या काळात कॉँग्रेस-प्रणीत केंद्र सरकारला संसदेत बहुमत नसल्यामुळे, आणि डाव्या पक्षांच्या लोकसभेतील ६१ खासदारांच्या दबावामुळे तीन महत्त्वाचे कायदे तेव्हा केंद्र सरकारला करणे भाग पडले. माहितीच्या अधिकाराचा कायदा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) आणि वनाधिकार कायदा असे ते तीन कायदे होते. मनरेगा मुळे देशभरातील शेतमजुरांच्या चळवळीला तेव्हा फार मोठा आधार मिळाला. वनाधिकार कायद्याचे नियम तयार करण्यासाठी जो सरकारी टास्क फोर्स बनवला होता त्यात तत्कालीन खासदार वृंदा कारत आणि बाजुबान रीयांग यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार शिराळकर यांना जबाबदारी दिली होती. कुमार यांनी ते काम देशभर फिरून प्रचंड मेहनतीने आणि जबाबदारीने केले. हे त्यांचे देशातील आदिवासी चळवळीला मोठे योगदान होते. पक्षाने आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच काही वर्षांपूर्वी स्थापन केला, तेव्हा कुमार त्याच्या सामूहिक नेतृत्वात होते.

आज अर्थात या सर्व कायद्यांवर, आणि संपूर्ण देशावर, भाजपच्या मोदी सरकारचे अत्यंत घातक हल्ले सुरू आहेत. पण त्यांचा त्वेषाने प्रतिकार सुद्धा होत आहे.

अष्टपैलू कार्य

गेल्या ४० वर्षांतील कुमार यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील योगदान चळवळ आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात असामान्य होते. धुळे-नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. अनेक उत्तम आणि लढाऊ कार्यकर्ते त्यांनी या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभर आपल्या प्रेरणादायक उदाहरणातून तयार केले. पक्षाची सर्व आंदोलने आणि मोहिमांत ते नेहमीच अग्रभागी असायचे. स्थलाभावी त्या सर्वांचा उल्लेख या लेखात करणे शक्य नाही. पक्षाच्या व जनसंघटनेच्या कामासाठी ते गेले नाहीत असा एकही जिल्हा महाराष्ट्रात नाही.

कुमार यांनी इतर अनेक राजकीय-सामाजिक आंदोलनांत तसेच विधायक कार्यात पुढाकार घेतला. आणीबाणीत त्यांना झालेली अटक व नंतर भूमिगत जीवन, नामांतराचे आंदोलन, भूमिहीन हक्क संरक्षण समितीचे संघर्ष, सामाजिक अत्याचारविरोधी परिषदेचे आयोजन, नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यात मोड या गावी कॉ. बी. टी. रणदिवे हायस्कूलची स्थापना, एनरॉनविरोधी आंदोलन, लातूरच्या किल्लारी भूकंपातील भरीव मदतकार्य, दलित अत्याचाराविरुद्ध खर्डा लॉन्ग मार्च, लोकविज्ञान व भारत ज्ञान विज्ञान या संघटनांच्या कार्यात मदत, पर्यावरणाच्या प्रश्नात हस्तक्षेप अशा अनेक उदाहरणांमधून त्यांचे अष्टपैलू कार्य स्पष्ट होते.

१९८५ पासून पक्षाच्या राज्य कमिटीवर, १९८८ पासून पक्षाच्या राज्य सचिवमंडळावर, आणि २००५ पासून पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर असताना, प्रकृतीच्या आणि कौटुंबिक कारणास्तव २०१५ साली ते या पदांवरून निवृत्त होईपर्यंत, आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत, त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी आणि जनचळवळीसाठी झोकून दिले. हे सर्व करताना त्यांच्या आई आणि बहिणींची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली.

डाव्या चळवळीचा वैचारिक आधारस्तंभ

तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांचा मिलाफ असला पाहिजे या मार्क्सवादी तत्त्वाचे कुमार हे मूर्तिमंत उदाहरण होते. महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचे कुमार हे एक वैचारिक आधारस्तंभ होते.

१९७४ साली लिहिलेल्या ‘उठ वेड्या तोड बेड्या’ या गाजलेल्या पुस्तिकेपासून ते २०१५ साली प्रकाशित झालेल्या ‘धर्म, जाती आणि वर्ग’ आणि ‘नवे जग, नवी तगमग’ या त्यांच्या पुस्तकांपर्यंत कुमार यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून विपुल लिखाण केले. साम्राज्यवादधार्जिण्या आणि कॉर्पोरेटधार्जिण्या नवउदारवादी धोरणांचे श्रमिकांवर हल्ले, धर्मांधता आणि जातपातवादाचा देशघातकी धोका, महिलांवर अनेकविध प्रकारचे जुलूम, कामगार-शेतकरी-शेतमजूर एकजूट, पर्यावरणाची गंभीर समस्या अशा कित्येक विषयांचे त्यांनी प्रगल्भ विश्लेषण केले. या सर्व प्रश्नांवर ते एखाद्या निष्पक्ष अभ्यासकाप्रमाणे नव्हे, तर मनस्वी त्वेषाने बोलत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे देशाच्या संविधानावर, लोकशाहीवर, धर्मनिरपेक्षतेवर आणि आर्थिक-सामाजिक न्यायावर होणारे फॅसिस्ट स्वरूपाचे हल्ले यांच्यावर कुमार नेहमीच प्रखरतेने तुटून पडत असत.

कुमार यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लेखन व भाषणे पोथीनिष्ठ कधीच नव्हती. मार्क्सवादी साहित्यासोबतच फुले-आंबेडकरी आणि गांधीवादी साहित्यावरही त्यांची चांगलीच पकड होती. त्यातून त्यांच्या लिखाणात, शिबिरांत आणि भाषणांत समृद्धपणा येत असे. आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष चळवळीच्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची त्याला अतूट जोड मिळत असे.

मार्क्सवादी, फुले-आंबेडकरवादी आणि गांधीवादी अशा तिन्ही प्रवाहांशी सुरुवातीपासून कुमार यांचा व्यापक जनसंपर्क असल्यामुळे त्या सर्वांच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी जाणीवपूर्वक ठेवलेला संवाद अखेरपर्यंत कायम राहिला. डावी लोकशाही आघाडी बांधण्याच्या पक्षाच्या मूलभूत धोरणानुसार सर्व डाव्या, फुले-आंबेडकरी आणि पुरोगामी शक्ती एकत्र आल्या पाहिजेत यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले.

कुमार यांच्या व्यक्तिगत गुणांबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल अनेकांनी मनापासून लिहिले आहे. त्यांचा निःस्वार्थीपणा, त्याग, संयम, प्रेम, जिव्हाळा, मितभाषीपणा, विनोदबुद्धी, या सर्वाबरोबरच त्यांची प्रखर तत्त्वनिष्ठा, वर्गशत्रूशी लढताना खंबीरपणा याची असंख्य उदाहरणे आपण वारंवार अनुभवली आहेत.

काही व्यक्तिगत आठवणी

कुमार यांची माझी पहिली भेट ते पक्षात आल्यानंतर ४० वर्षांपूर्वी १९८२ साली धुळ्याला झाली. मी एस.एफ.आय.चा राज्य सरचिटणीस असताना कुमार, प्रकाश सामंत आणि तेव्हा धुळे एस.एफ.आय.चे जिल्हा सचिव असलेले विजय पाटील अशी ती भेट झाली. पहिल्या भेटीतच त्यांच्याविषयी आदर आणि जिव्हाळा निर्माण झाला.

कुमार आणि माझी कार्यक्षेत्रे वेगवेगळी असली – ते शेतमजूर आघाडीत तर मी क्रमाक्रमाने विद्यार्थी, युवा आणि किसान आघाडीत – तरी पक्षाच्या अनेक कार्यक्रमांत आणि आंदोलनांत, पक्षाच्या राज्य कमिटीच्या आणि केंद्रीय कमिटीच्या बैठकींत आम्ही एकत्र असायचो. धुळे-नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थी, युवा व किसान आघाडीच्या कार्यासाठी आणि पक्षाच्या जिल्हा अधिवेशनांसाठी व शिबिरांसाठी मी अनेकदा जायचो तेव्हाही कुमार यांची भेट व्हायची. या सर्व प्रसंगी अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा व्हायची, विनोद व्हायचे, मने जुळायची. असे खूप प्रसंग लिहिण्याजोगे आहेत, पण जागेची मर्यादा आहे.

एप्रिल २००५ मध्ये दिल्लीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची १८वी कॉँग्रेस (अखिल भारतीय अधिवेशन) भरली. पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर तेव्हा अहिल्याताई रांगणेकर, प्रभाकर संझगिरी व मी असे तिघेजण होतो. वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव अहिल्याताईंनी केंद्रीय कमिटीतून निवृत्त होण्याचे ठरवले. महाराष्ट्राचे प्रभारी तेव्हा आज पक्षाचे सरचिटणीस असलेले सीताराम येचुरी होते. आदल्याच महिन्यात झालेल्या सोलापूरच्या राज्य अधिवेशनात प्रभाकर संझगिरी राज्य सचिव म्हणून निवृत्त होऊन त्या जबाबदारीवर माझी निवड झाली होती. त्यामुळे दिल्लीच्या पक्ष कॉँग्रेसमध्ये मला प्रथम बाजूला घेऊन सीताराम यांनी मला विचारले, अहिल्याताईंच्या जागेवर महाराष्ट्रातून केंद्रीय कमिटीत कोणाला घ्यावे? क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर दिले, कर्तुत्व पाहता कुमार शिराळकर यांचेच नाव योग्य आहे. सीताराम यांनी नंतर संझगिरी आणि अहिल्याताईंना तोच प्रश्न विचारला. त्यांनीही तेच उत्तर दिले. अर्थात सीताराम यांचे स्वतःचेही तेच मत होते.

त्यातील विशेष बाब म्हणजे कुमार यांची केंद्रीय कमिटीवर निवड झाली तेव्हा ते दिल्लीच्या पक्ष कॉँग्रेसमध्ये स्वतः हजरच नव्हते! वस्तुतः त्यांची प्रतिनिधी म्हणून राज्य अधिवेशनाने साहजिकच निवड केली होती. पण पर्यायी प्रतिनिधींपैकी एक कॉम्रेड पक्षाच्या कॉँग्रेसला कधीच गेला नव्हता, त्याला जाता यावे म्हणून कुमार स्वतः मुद्दाम आले नाहीत! कुमार यांच्या निःस्वार्थीपणाचे ते आणखी एक उदाहरण होते!

६-१२ मार्च २०१८ या काळात महाराष्ट्र राज्य किसान सभेने आमदार जे. पी. गावीत आणि इतर कार्यकर्त्यांच्या सामूहिक नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई असा देशभर गाजलेला किसान लॉन्ग मार्च काढला. कुमार यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा अखेरच्या दिवशी आणि रात्रभर ते आमच्यासोबत अखंड चालले, हे आम्ही कोणीच विसरू शकत नाही. भाजपच्या फडणवीस सरकारला झुकावे लागले, किसान सभेला सर्व मागण्यांवर लेखी आश्वासने द्यावी लागली, ती विधान भवनाच्या दोन्ही सभागृहांपुढे ठेवावी लागली, याबद्दल कुमार यांनी तेव्हा किसान सभेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे मिठी मारून अभिनंदन केले.

२०२०-२१च्या दिल्लीतील अभूतपूर्व शेतकरी आंदोलनाचा कुमार बारकाईने अभ्यास करत होते. मला अधूनमधून प्रोत्साहनपर संदेशही व्हाट्सअप्पवर पाठवायचे. वर्षभराच्या जबरदस्त संयुक्त आंदोलनाच्या परिणामी ९ डिसेंबर २०२१ रोजी मोदी सरकारला जेव्हा शेवटी झुकावे लागले आणि शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय झाला, तेव्हा कुमार यांनी मला व्हाट्सअप्पवर जो अभिनंदनाचा प्रेरणादायक संदेश पाठवला, तो मी आयुष्यभर जपून ठेवेन.

या वर्षी ७ मार्च रोजी व पुन्हा ३ सप्टेंबर रोजी कुमार यांची माझी भेट झाली, ती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलात. पहिल्या भेटीत मी त्यांना परळहून भांडुपला डॉ. विवेक मोंटेरो यांच्या घरी सोडले, तेव्हा त्यांच्याशी झालेली चर्चा ती अखेरचीच. दुसऱ्या भेटीत ते अत्यवस्थ होते, पण आम्हाला पाहिल्यावर त्यांनी लगेच हात उंचावून लाल सलाम केला. ती आमची शेवटची भेट!

कुमार यांच्या अखेरच्या आजारपणात नंदुरबार जिल्ह्यातील जयसिंग माळी, नथू साळवे आणि त्यांचे इतर सर्व जिवाभावाचे कॉम्रेडस्, मुंबईत डॉ. विवेक मोंटेरो व त्यांचे सहकारी, नाशिकमध्ये डॉ. डी. एल. कराड व त्यांचे सहकारी, पुण्यामध्ये डॉ. ज्ञानेश्वर मोटे, डॉ. महारुद्र डाके, डॉ. अमोल वाघमारे व त्यांचे सहकारी यांनी त्यांची खूप आस्थेने काळजी घेतली.

२ ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी कुमार यांची प्राणज्योत निमाली. ३ ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत स्थानिक आदिवासी पद्धतीप्रमाणे कुमार यांचे मोड या गावी कॉ. बी. टी. रणदिवे शाळेच्या प्रांगणात दफन करण्यात आले. तीही एक क्रांतिकारक घटनाच होती. कुमार ज्यांच्याकडे गेली ५० वर्षे त्यांच्या कुटुंबाचा भाग म्हणून राहिले ते गुंजाळी गावचे त्यांचे अत्यंत जवळचे कॉम्रेड नारायण सजन ठाकरे यांचे निधनही कुमार यांचा दफनविधी झाल्यावर काही तासांतच हृदयविकाराच्या झटक्याने झाले. किती घनिष्ठ आणि अतूट कॉम्रेडशिप होती ती!

अलीकडच्या वर्षांत आमच्या पिढीतले अनेक उत्तमोत्तम कॉम्रेडस् आपल्याला सोडून गेले याची तीव्र खंत अजूनही माझ्या मनात आणि हृदयात कायम आहे. कॉम्रेडस् महेंद्र सिंह, डॉ. विठ्ठल मोरे, उद्धव भवलकर, बारक्या मांगात, रतन बुधर – आणि आता कुमार शिराळकर!

एक असामान्य कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरो तर्फे, अखिल भारतीय किसान सभेतर्फे आणि माझ्यातर्फे अखेरचा भावपूर्ण लाल सलाम! त्यांचे कार्य खूप जास्त जोमाने आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाणे हीच त्यांना आपली खरी आदरांजली!

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *