Breaking News

प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील विविध शहरातून किती प्लास्टिक जमा होते, त्यावर रिसायकलिंग केले जाते का ?  याचा अहवाल आठ दिवसात द्यावा. पर्यटन स्थळे व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कापडी पिशव्या या कापडी नसून त्या प्लास्टिकच्याच असतात. अशा पिशव्या उत्पादन करणारे, साठवणूक करणारे व दुकानदार यांच्यावर तातडीने कारवाई करुन साठा जप्त करावा. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. विनापरवाना ज्या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या, कारखाने आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अशा कंपन्या सील करण्याचे आदेश त्यांनी दिले.

राज्यात ठिकठिकाणी शहरांमध्ये प्लास्टिक उत्पादनाची साठवणूक करण्यासाठी गोडाऊन आहेत. ती शोधा, सील करा, माल जप्त करा. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण समिती आहे, प्लास्टिक बंदी संदर्भात त्यांनी जिल्ह्यात कशा प्रकारे जनजागृती केली याचा आढावा घ्यावा. तसेच उद्या दि. 23 जूनपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक व थर्माकोल बंदीला नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे म्हणाले, प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्यासाठी गणेश मंडळाची बैठक घ्यावी, मंडळांना विश्वासात घेऊन प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्या परिणामांची माहिती द्यावी. तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांनी आपल्या घरातील प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिक कलेक्शन सेंटरवर आणून द्याव्यात. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *