Breaking News

अजित पवार म्हणाले, माझी हात जोडून विनंती, २ वरच थांबा उगाच पलटण वाढवू नका देवाची कृपा की कोणाची कृपा आम्हाला माहितच आहे

वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणावरून नेहमीच राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जातात. मात्र हाच मुद्दा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अतिशय मिश्किलपणे उपस्थित करत छोटे कुटुंब सुखी कुटुंबाचा सल्ला दिला.

बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, ‘माझी महिलांना हात जोडून विनंती आहे की, २ अपत्यांवरच थांबा. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब हे देखील एका मुलीवरच थांबले. सुप्रिया सुळे झाल्यानंतर ते थांबले. आता जिकडे तिकडे सुप्रिया सुळेंचे नाव घेतात. तसेच तुम्ही देखील थांबा. नाहीतर म्हणाल की, देवाची कृपा, देवाची कृपा आहे. आम्हाला माहिती आहे कोण कृपा करते आहे’ असा उपरोधिक चिमटा लोकसंख्या वाढीच्या मुद्यावरून काढला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी बारामती शहरातील विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. त्यानंतर गरजू महिलांना १ हजार स्वेटर, ५०० साडी वाटप तसेच १५ सिलाई मशीनचे वाटप अजित पवारांच्या हस्ते झालं.

‘माझी महिलांना विनंती आहे की, आपली सून आली, मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर २ अपत्यावर थांबा. पोरी सोन्यासारख्या आहे. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब एका मुलीवर थांबले. सुप्रियाताईंनी नाव काढलं नाही का? नुसतं पोरगंच पाहिजे, पोरगंच पाहिजे, असं करू नका. तुम्ही देखील थांबा नाहीतर म्हणाल की, देवाची कृपा देवाची कृपा आहे. देव वरून देतोय, आम्हाला माहिती नाही का कुणाची कृपा आहे, असं आवाहन करताच उपस्थितांमध्ये एकच हश्शा उसळला.

समाजामध्ये महिलांकडे कोणी वाकड्या नजरेने बघू नये कोणी दहशत गुंडगिरी पसरवण्याच्या काम करू नये. कोयता गँग अन फोयता ग्यांग आसल अजिबात चालणार नसुन याची नोंद पोलिस खात्याने घ्यावी मी कधीही चुकीच्या गोष्टींवर पांघरून टाकलेले नाही. बारामतीत वेडे वाकडे धंदे होता कामा नये, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

‘जर कुठ चुकत असेल तर माझ्या निदर्शनास आणून द्या, त्यावर मी तुम्हाला आधार देण्याचे काम करेल. जस घर स्वच्छ ठेवता, तसे शहर स्वच्छ ठेवा. कृषी प्रदर्शन भरवतो आहोत. कुणी कुठंही टपऱ्या टाकू नका, असा सल्लाही अजित पवारांनी दिला.

‘बारामतीचा विकास करताना सामाजिक संस्थांची मदत घेतो. काही ठिकाणी आपण आपला स्वतःचा खर्च करून काही कामे करतो. सायकली दिल्या तर त्या चांगल्या पध्दतीने ठेवा. कॅनॉल चांगला केला आहे. तर कॅनॉल आटला की त्यात गोधड्या आणून टाकू नका, अशी विनंती करत ते पुढे म्हणाले, आगामी काळासाठी म्हणून आपल्या लोकांना पाणी मिळावे यासाठी आपण पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत. तसेच आपल्या सर्वांसाठी चांगल्या सोयी-सुविधाही निर्माण करत आहोत. त्यामुळे कुटंब छोटं ठेवा आणि चांगल्या गोष्टींचा उपभोग घ्या असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

आमच्या जीवात जीव असे पर्यंत तुम्ही आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार आहोत. मी आणि माझे सहकारी तुम्हाला चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *