Breaking News

राऊत हे सेनेचे खासदार मात्र दिल्लीत पवारांचा माणूस म्हणून ओळख भाजपा खासदार नारायण राणे यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली. मात्र आता त्याच सामनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या शरद पवारांचा उदोउदो करण्यात येत असून संजय राऊत हे जरी शिवसेनेचे खासदार असले तरी दिल्लीत मात्र ते पवारांचा माणूस म्हणून ओळख असल्याची टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या मुखपत्रात शरद पवार यांची मॅरथॉन मुलाखत प्रसिध्द होत आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी वरील टीका केली.
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे जर आज हयात असते तर त्यांनी कधीच काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जावून सत्ता स्थापन करण्यास परवानगी दिली नसती. शिवसेनेला विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत ज्या काही जागा मिळाल्या त्या भाजपा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचा दावा करत शिवसेनेने एकट्याने या निवडणूका लढविल्या असत्या तर आता जेवढ्या मिळाल्या तेवढ्याही मिळाल्या नसत्या अशी टीकाही त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती असूनही दौरा करत असून प्रत्येक ठिकाणचा आढावा घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असल्याने त्यांचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनल्याची टीका त्यांनी केली.
कोरोनाची स्थिती हाताळताना कोणाचाच पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडतच नसल्याने त्यांना राज्यातील नेमकी स्थिती काय आहे, हे कळतच नाहीये. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नसल्याने स्थिती भयानक बनली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. मात्र या राज्यातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे राज्यातील गंभीर बनलेल्या स्थितीबाबत पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन घेण्याऐवजी भूतकाळातील राजकीय घडामोडींबाबत मुलाखत घेऊन मुलाखतकारांनी आपल्याला राज्यातील स्थितीचे भान नाही हेच दाखवून दिले. राज्यातील गंभीर स्थितीवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ही मुलाखत घेतली असावी, अशी टीकाही त्यांनी केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *