Breaking News

राज ठाकरे म्हणाले, देशमुख यांचा मुद्दा महत्वाचा नाही तर स्फोटकांच्या गाडीचा मुख्य विषयावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा मुद्दा

मुंबई : प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा असून अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नसल्याचे वक्तव्य करत मुळ विषयावरून भरकटवू नका असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

सद्यपरिस्थितील लॉकडाऊन लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काही सूचना करण्यासाठी फोनवरून चर्चा केली. त्याची माहिती देण्यासाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परमबीर सिंग ह्यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण त्यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवलं गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? आणि बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप होणंच लांच्छनास्पद असल्याचे सांगत जर परमबीर सिंगांना पदावरन हटवलचं नसतं तर हे बाहेर तरी आलं असतं का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्यातील सरकार अस्थिर करण्याच्या अनुषंगाने विरोधकांकडून हलाचाल करण्यात येत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मंत्र्याकडून तशी कामे होत असल्यानेच विरोधक आरोप करत आहेत ना? मग सरकार पाडण्याचा विषय कुठे येतो असे सांगत मंत्री तसे काम करत असल्यानेच त्यांच्यावर आरोप होत असून त्यामुळेच त्यांना राजीनामे द्यावे लागत असल्याची बाबही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.

लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो. पण त्यांच्या आसपास अनेकजण कोरोनाबाधित असल्यामुळे ते विलगीकरणात होम क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही झूमवर संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे. पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात त्या राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथील कोरोना बाधितांचे आकडेच बाहेर येत नाहीत. याउलट राज्यात मात्र कोरोनाच्या चाचण्या होत असल्याने आपल्याला आकडे तरी कळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागच्या लॉकडाऊनच्या वेळेला जेंव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले. तेंव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण सरकारने हे केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य सरकारने छोट्या उद्योगांना त्यांचं उत्पादन चालू ठेवण्याची परवानगी दिली. पण त्याची विक्री करण्यास परवानगी दिली नाही. अर्थात दुकाने बंद केली. जर उत्पादनाची विक्रीच होणार नाही तर उत्पादन करायचं कशासासाठी असा सवाल उपस्थित करत जर माल उत्पादीत केलं तर त्याला ठेवायचं कुठे ? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी अशी सूचनाही सरकारकडे केली.

लॉकडाऊनच्या काळात वीजबिलं माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिलं कशी भरायची? बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरु आहे, त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत कारण मुळात उद्योग बंद आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत अशा वेळेस जो तगादा सुरु आहे तो थांबायला हवा. ह्या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करण्याबाबत राज्य सरकारने ठोस पावले उचलावित अशी मागणी करत मागील वर्षे दिड वर्षापासून सर्वच बंद आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असेल कोणत्या मानसिकतेत असेल याचा विचार करून १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकला अशी मागणीही त्यांनी केली.

ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे. तो कोसळला तर सगळंच अडचणीत येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने स्वत:कडून शेत मालाला हमीभाव द्यायला हवा, खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी आणि जिमसारख्या जागा जिथे गर्दी न होऊ देता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी अशी सूचनाही त्यांनी केली.

राज्यात कोरोनाचा प्रसार होत असताना अनेक खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. याबाबतची माहिती घेतली तर खाजगी रूग्णालये सांगतात नगरसेवक, आमदार, मंत्री फोन करतात त्यावेळी त्यांनाही बेड द्यावे लागतात. या हॉस्पीटलवाल्यांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे आम्हाला ही समजावून सांगता येत पण आमची पध्दत वेगळी असल्याचा गर्भित इशारा रूग्णालयांना देत आता ती ही वेळ नाही. त्यामुळे अशा रूग्णांलयांबाबत सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत अशी सूचनाही त्यांनी केली.

मला काल एकाने विनोद पाठविला, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?’ असल्याचे सांगत सध्याच्या राजकिय परिस्थितीवर विनोदी पध्दतीने सूचक भाष्य केलं.

माझे पक्षातील सहकारी जमील शेख ह्यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला ह्याचं नाव आलं आहे. ह्याच पदाधिकाऱ्यांचं नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आलं होतं. ह्याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. ह्यासंबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *