Breaking News

ते प्रकरण आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाहीत यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही-नवाब मलिक यांचे प्रति आव्हान

मुंबई: प्रतिनिधी

हे काय आम्हाला धमक्या देत आहेत.. यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही… असे प्रति आव्हान भाजपाला देत मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

आज ज्यांच्यावर आरोप होते ते बाहेर आले आणि जे आरोप करत होते ते आरोपांच्या पिंजर्‍यात आहेत. एकंदरीत सिनेमाचा सिक्वेन्स बदलला आहे, त्याचा अंत तर होणारच आहे आणि जोपर्यंत हे प्रकरण धसास लावत नाही तोपर्यंत थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी आज दिला.

दुसरा के पी गोसावी की काय ते माहित नाही, पण मग हे एवढे का घाबरत आहेत. दाऊद की ज्ञानदेव… यास्मिन की जास्मिन… काशिफ खान की काशिफ मलिक खान… नावांचा खेळ या सिनेमात मोठा आहे… नाव बदलून तो मी नव्हेच हे सांगून चालणार नाही असेही ते म्हणाले.

समीर वानखेडे याचे कुटुंब आठवले आणि सोमय्या यांना भेटत आहेत. त्या अगोदर समीर वानखेडे याने आठवले यांची भेट घेतली आहे. तर काही मागासवर्गीय नेत्यांचीही भेट घेतली आहे. भाजपचा एक दूत जो माजी मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये होता तो जाऊन समीर वानखेडेला ईडीच्या कार्यालयात भेटतोय. तो इतका जवळचा आहे की, माजी मुख्यमंत्री त्याच्या घरीही जात होते. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये सहज प्रवेश होता. तो चेंबूरमध्ये राहतो. जेव्हापासून मी हा विषय लावून धरला आहे तिथपासून हा गृहस्थ ईडी कार्यालयात जात आहे. तो का जातो? कुणासाठी जातो? कुणाच्या मनात काय भीती आहे? हे सगळं फर्जीवाडा करुन सुपारी वाजवण्याचे काम होते का? असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

या चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून काय चाललंय? हा का जातो आणि कशासाठी याची माहिती आतले अधिकारी सांगत आहेत. जर समीर वानखेडेवर भाजपाचे प्रेम असेल तर त्याला उघडपणे भेटा ना दूताच्या माध्यमातून कशाला भेटता अशी विचारणा करतानाच संपूर्ण भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे काहीतरी गौडबंगाल सुरू आहे.. धुगधुगी त्यांच्या मनात सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.

काल मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर दाऊद वानखेडे याने धर्म बदलला नाही असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना केले. हलदर तुम्ही संविधानिक पदावर आहात त्याचा मान राखा असे सांगतानाच आयोगाची एक कार्यप्रणाली आहे. एखाद्याने तक्रार केली तर त्याची चौकशी केली पाहिजे व त्याची प्रक्रिया करुन तसा रिपोर्ट संसदेत ठेवून यावर शिफारस मागितली पाहिजे. परंतु तुम्ही माध्यमातून कसे काय सांगू शकता अशी विचारणाही त्यांनी केली.

दरम्यान समीर वानखेडे याने धर्म बदलला नाही हे तुम्ही बोलत आहात हे सत्य आहे. कारण तो जन्मापासूनच मुसलमान आहे. त्याच्या वडिलांनी धर्म बदलला होता. दोन्ही मुलं लहानपणापासून मुसलमान आहेत. मुसलमान पध्दतीने जगले आहेत. मी समीर वानखेडे याच्या लग्नाचा विषय समोर आणला. मी काल (शनिवारी) एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला. तो समीर वानखेडे याच्या बहिणीचा नवरा आहे. आज तो युरोपच्या वॅनिसमध्ये राहतो. मुळचा तो सुरतचा राहणारा आहे. हा विषय आम्ही समोर आणला आहे. जिचा नवरा आहे तिने ट्वीट करुन हा फोटो का आणला अशी विचारणा केली. मी हा फोटो समोर आणला नाही. जर तुमच्याकडे आयोग चौकशी करेल त्यावेळी आम्हाला मिळालेल्या अधिकारानुसार आम्ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व जात पडताळणी समितीकडेही तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मी धर्म आणि जातीची लढाई लढत नाहीय त्याने फर्जीवाडा केला. दलित तरुणांचा अधिकार हिरावून घेतला त्याविरोधात लढाई आहे असे सांगतानाच हलदर तुम्ही कधी पदावर आलात हे माहीत नाही. परंतु ज्या पदावर बसला आहात त्या पदाची गरीमा बदनाम करु नका असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *