Breaking News

बहुजन आघाडीतले “वंचित” बनू लागले प्रस्थापित लक्ष्मण माने, एमआयएमनंतर गोपीचंद पडळकर बाहेर

मुंबईः प्रतिनिधी
प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या राजकिय पक्षांना समर्थ पर्याय ठरण्यासाठी आणि उपेक्षित-वंचित समाजाचा स्वतंत्र आवाज निर्माण करण्यासाठी अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र या वंचित आघाडीतून भटक्या-विमुक्त जमातीचे लक्ष्मण माने, मुस्लिम धर्मियांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा एमआयएम हे आधीच पडले असून धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेले गोपीचंद पडळकर यांनीही आता वंचितमधून बाहेर पडून प्रस्थापित राजकिय पक्षात प्रवेश करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली.
वंचित आघाडी स्थापन करत असताना सामाजिकबरोबरच राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर असलेल्या भटक्या-विमुक्त जाती जमाती, रामोशी, बेरड, धनगर, माळी, मागासवर्गीय-मुस्लिम समाजातील उपेक्षित जाती आदी यांना घेवून स्वतंत्र राजकिय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. लोकसभा निवडणूकीत या सर्व समाजातील मतदारांनी मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीला मतदानही केले. मात्र लोकसभा निवडणूक होताच बहुजन आघाडीत बिघाडी सुरु होण्यास सुरुवात झाल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
यास प्रामुख्याने अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा स्वभाव आडवा येतो. कोणताही निर्णय घेताना ते कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेत नाहीत. तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मत विचारात घेत नाहीत की त्यांच्या शंकाचे निरसन करत नाहीत. त्यामुळे वंचित बहुजनच्या निमित्ताने एकत्रित आलेले मतदार आता पुन्हा एकदा आंबेडकरांपासून दुरावात असून त्याचाच एक भाग म्हणून हे सर्वजण पुन्हा एकदा प्रस्थापित राजकिय पक्षांची किंवा त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी धडपडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकर हे लोकसभा निवडणूकीत भाजपा किंवा काँग्रेसकडून तिकिट मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र भीमा-कोरेगांव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांचे ते कार्यकर्त्ये असल्याने त्यांना त्या प्रस्थापित पक्षांनी तिकिट नाकारले. तरीही आंबेडकरांनी त्यांना वंचित मध्ये घेत त्यांना संधी दिली. आता ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ते वंचित पासून फारकत घेत प्रस्थापित पक्षात जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकर यांनीही एका वृत्तवाहीनीशी बोलताना आपण वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देत असून पुढील एक-दोन दिवसात भाजपा आणि इतर पक्षात जाण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *