Breaking News

छगन भुजबळ, अजित पवारांचा हल्लाबोल, सरकार रंगाची होळी खेळत असताना… शेतकऱ्यांची 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा

अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली.

गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
सरकार तातडीने मदत काय करणार, केंद्रसरकारचे पथक कधी येणार आहे असा सवालही अजित पवार यांनी केला.

अजित पवार यांच्यानंतर छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल करताना म्हणाले, मंगळवारी सरकार रंगाची होळी खेळत होते, त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची होळी होत होती अशा शब्दात सरकारवर हल्लाबोल करत नाराजी व्यक्त केली.
तसेच सरकार यावर ताबडतोब काय पाऊले उचलणार आहे हे सांगितले पाहिजे. शेतकरी कर्ज कसे फेडणार आहेत असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी केला.

गेले तीन दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. त्यानंतर झालेल्या नुकसानीची आकडेवारी आणि अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आणि याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचे म्हणणे मांडेल असे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *