Breaking News

भाजपा आमदार नितेश राणे यांचा सवाल, ठाकरेंना जन की… समजते की धन की बात १०० खोक्यांसाठी बारसूचा पत्र व्यवहार केल्याचा आरोप

ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आले असून सोलगांव, बारसू येथील स्थानिक नागरिकांशी बारसू रिफायनरीवरून संवाद साधला. तर, भाजपानेही रिफायनरी समर्थनार्थ कोकणात कार्यक्रम हाती घेतला आहे. ठाकरे आणि भाजपाच्या कार्यक्रमांना कोकणात परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्याकरता भाजपा नेते नितेश राणे यांनीही आज जनतेशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये प्रकल्प होण्याकरता लिहिलेल्या पत्रावरून टीका केली. तसेच ठाकरेंना जन की..समजते की धन की बात समजते हे त्यांनीच सांगावे असा उपरोधिक सवालही भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला.

भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले, ग्रीन रिफायनरी कोकणात होतेय, त्याचं समर्थन करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. कोणीतरी एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही म्हणून जैतापूरमध्ये उभं केलं आहे. बारसू गावात लोकांशी बोलून, पेटवापेटवीचं काम करून ते पुन्हा मुबंईच्या दिशेने जाणार आहेत. मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख करून द्यायची झाली तर महाराष्ट्रातला सर्वांत दलाल कोण असेल तर रत्नागिरी बारसूमध्ये आलेला आहे, अशी टीका केली.

नितेश राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं की, आमचे पंतप्रधान मोदी फक्त ‘मन की बात’ करतात. ती भाषा कोणालाच कळत नाही. गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान जनतेच्या मन की बात समजतात म्हणूनच लोकांनी त्यांना पुन्हा निवडून दिलं आहे. पण उद्धव ठाकरे मन की बात समजतात की ‘धन की बात’ समजतात हे त्यांनी आम्हाला सांगावं. नेमकं ते इथे पेटवण्याचं काम करण्याची भाषा करत आहेत, ते पेटवा पेटवी करण्यासाठी नाही तर आपल्या घराची चूल पेटली पाहिजे याकरता ते येथे स्वतः आले आहेत.

पुढे टीका करताना नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पंतप्रधानांना बारसूत रिफायनरी झाली पाहिजे अशा समर्थनार्थ पत्र काढलं. आता विरोधी पक्षात असताना त्यांना ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याचं स्वप्न पडताहेत. हा नेमका विचार कसा बदलला, हा विचार कोकणाच्या जनतेसाठी बदलला नाही, पण खिशात पैसे आले पाहिजेत, मातोश्रीवर खोके पोहोचले पाहिजेत याकरता विचार बदलला आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की, तेव्हाचे सरकार म्हणून केंद्र सरकारकडे जे पत्र पोहोचवलं होतं त्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती. ते १०० खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून पत्र व्यवहार केला होता असा आरोप करत राणे पुढे म्हणाले, उद्धवजींना विचारायचं आहे की हेलिकॉप्टरने कोकणात आला आहात, ठाकरे आणि ठाकरे कुटुंबांचा व्यवसाय काय, कोणता धंदा किंवा व्यवसाय करतात ज्यामुळे ते हेलिकॉप्टरमधून फिरतात, असा सवालही यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंनी कोकणातील रिफायनरीला विरोध केल्याने भाजपा नेते नितेश राणेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी कोकणातील बेरोजगारीबद्दलही ते बोलले. सगळा पैसा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी कमवायचा का? माझ्या कोकणातील तरुण-तरुणांनी कमवायचा नाही का? असा सवालही यावेळी नितेश राणे यांनी ठाकरेंना केला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *