Breaking News

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पोस्टर्स लावले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही…१४५ आमदार… मिटकरी यांच्या ट्विटवरून हसन मुश्रीफ यांची सावध प्रतिक्रिया

राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अजित उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने यापूर्वी जाहिर केले होते. मात्र इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटना घडली असून त्यात आता पर्यंत २२ लोकांचा मृत्यू तर १०५ नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपला वाढदिवस साजरा करण्याऐवजी इर्शाळवाडी दरड दुर्घटनाग्रस्तांना मदत करा, असं आवाहन अजित पवार यांनी केले. पण त्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या चौकांमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स लावले आहेत. तर काही होर्डींग्जवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे एकत्र असलेले फोटो या होर्डिंग्सवर वापरण्यात आले असून त्यात अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्याचबरोबर अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अशाच पद्धतीचं एक ट्वीट केलं आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्यात अजितपर्व सुरू होईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमधून केल्याचं पाहायला मिळत आहे.

काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांना अजित पवारांच्या होर्डिंग्सबाबत (भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेल्या) प्रश्न विचारला. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, फक्त पोस्टर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी १४५ आमदार लागतात, ही गोष्ट अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना अनेकदा सांगितली आहे असे स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, त्यावर भावी मुख्यमंत्री लिहिलं आहे. भावी म्हणजे त्याला किती काळ आहे? दोन जण (देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. एक अद्याप व्हायचे आहेत. आता नियतीच्या मनात काय आहे हे माहिती नाही. परंतु लोकांच्या मात्र तशा अपेक्षा आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *