Breaking News

परिवहन मंत्री परब यांची घोषणा, एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु ११ हजार कर्मचारी कंत्राटीवर घेणार

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी देण्यात आलेली मुदत आज संपत आल्याच्या पार्श्नभूमीवर जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर उद्यापासून बडतर्फी, सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला धडक सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
आज संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार किती कर्मचारी कामावर हजर झाले आणि किती कर्मचारी हजर नाही झाले याची आकडेवारीसह माहिती माझ्याकडे येईल. त्यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर यापूर्वी बडतर्फी झालेली आहे, किंवा त्यांचे निलंबन आणि सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे. मात्र ते कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अशांवरील कारवाई दिलेल्या आश्वासनानुसार मागे घेतली जाणार आहे. परंतु राज्य सरकारने आवाहन करूनही आता जे कोणी कामावर हजर झाले नाहीत. त्यांच्यावरील कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याबाबतचे आदेश दिले असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, यासंदर्भात न्यायालयाचे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे आता कारवाईला उद्यापासून सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच उद्यापासून एसटीच्या सेवेत ११ हजार कर्मचारी कंत्राटीवलर घेणार असून त्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. जी कंपनी सक्षम असेल त्या कंपनीकडून हे ११ हजार कर्मचारी भरण्यात येणार आहेत. यामुळे राज्यात किमान सात ते आठ हजार बसेस रस्त्यावर धावतील असेही त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी, पुन:स्थितीकरणासाठी ३९ कोटी रुपये
एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ३९ कोटी रुपये आज महामंडळाला वितरीत करण्यात आले आहेत. या निधीतून एसटीच्या ३०० बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थींनींना बारावीपर्यंत शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते, त्या उद्दीष्टपूर्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व मुलींना गाव ते शाळेपर्यंत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. विद्यार्थींनींना वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्याची ही योजना नियमितपणे राबविण्यासाठी वर्ष २०११ ते २०१३ या कालावधीत प्रत्येक तालुक्याला ५ याप्रमाणे १२५ तालुक्यांना ६२५ बसगाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यानंतर टप्प्याटप्याने २४७ अतिरिक्त बसगाड्या खरेदी करण्यात आल्या. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत महामंडळातर्फे ८७२ बसगाड्या चालवण्यात येतात. महामंडळाला वर्ष २०११ ते २०१३ या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्राप्त झालेल्या व ॲल्युमिनियम धातूत बांधलेल्या ६२५ बसगाड्यांपैकी ज्यांची ‘बॉडी’ (बांधणी) नादुरुस्त स्थितीत आहेत. अशा ३०० वाहनांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरण करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत प्रतीवाहन १३ लाख रुपये खर्च करुन बसगाड्यांच्या पुन:स्थितीकरणाचे काम करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ३९ कोटी रुपयांचा निधी वितरीत केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष करुन विद्यार्थींनींचा एसटी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *