Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे पण बडतर्फीची नाही विलिनीकरणाबाबत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार- परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील एसटी संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. मात्र बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार नसल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली.

संपकरी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या विलिनीकरणाचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान भाजपाचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावरी चर्चेत सर्वश्री शशिकांत शिंदे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संपापूर्वी कृती समितीसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले होते, तरी संप सुरू राहिला. यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा लावून धरण्यात आला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नेमलेली ही समिती कामगार, युनियनसह सर्व बाजू ऐकुन घेऊन शासनास अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने एसटी कर्मचा-यांच्या पगारात वाढ केली असून  देशातील कोणत्याही राज्यात मिळणाऱ्या पगाराएवढा पगार आता या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. हा पगार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत नियमित जमा होईल याची हमी सुद्धा राज्य शासनाने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादरम्यान राज्याचे सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सामान्य जनता यामुळे वेठीस धरली गेली. कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करुनही अनेक कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यांच्यावर केलेल्या निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याचे आश्वासन देऊनही कामावर परतले नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत त्यांना कामावर घेता येणार नाही त्यासाठी वेगळी प्रक्रिया लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *