Breaking News

शरद पवार यांचा भाजपावर निशाणा, काही शक्ती जात-धर्मावरून लोकांमध्ये संघर्ष निर्माण… देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करतायत

आज देशामध्ये चित्र बदलते आहे. आज काही शक्ती आहेत ज्या देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जात-धर्म यावरुन सामान्य लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची खबरदारी घेत आहेत. आज ज्या राजकीय पक्षाच्या हातात देशाची सत्ता आहे ती सत्ता कष्टकरी लोकांसाठी, समाजातील लहान घटकांसाठी वापरायची समज या राजकर्त्यांना नाही आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावाने समाजात एक तेढ निर्माण केली जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे नाव न घेता केली.
हमाल माथाडी महामंडळाच्या २१ व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने अहमदनगर येथे लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज या ठिकाणी शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित जाहिर कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर होऊन गेले. दोन दिवस झाले या जिल्ह्यात बाजारपेठ बंद, जातीजातीमध्ये अंतर वाढवणे, संघर्ष वाढवणे हे काम काही शक्ती करत आहेत. या शक्तींशी संघर्ष करणे हे आव्हान तुमच्या आणि माझ्यासमोर आहे. हा संघर्ष केला नाही तर कष्ट करणारा हमाल असेल, गिरणीतील कामगार असेल त्याचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे असे आवाहनही केले.

तसेच शरद पवार यांनी सांगितले की, हमाल माथाडी महामंडळाच्या २१ व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण एकत्र आलो. ज्यांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा माथाडी आणि हमाल या क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा लोकांसाठी दिला ते लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज या ठिकाणी करण्यात आले. शंकरराव व त्यांचे सहकारी आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. कष्टकऱ्यांमधून आलेले नेतृत्व, २५ वर्षे नगरसेवक, सात वर्षे या अहमदनगरचे नगराध्यक्ष आणि अनेक वर्षे माथाडी कामगारांसाठी खस्ता खाणारा नेता म्हणून शंकररावांची ओळख सगळ्यांना आहे. त्याचे कायमस्वरुपी स्मरण राहावे म्हणून या ठिकाणी शंकररावांचा पुतळा उभा केल्याचे सांगितले.

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या सत्तांतरावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, चित्र बदलत आहे. काल मी बेंगलोरला होतो. आज त्या ठिकाणी काँग्रेसचे राज्य आले आहे. त्या ठिकाणी अनेक वर्षे काही लोकांचे राज्य होते. राज्य हातात घेऊन माणसांमध्ये द्वेष वाढण्याचे काम त्या लोकांनी केले. सर्व देशाला वाटत होते की कर्नाटकची निवडणूक ही सत्ताधारी जिंकणार. पण काल नवीन शपथविधी झाला आणि सामान्यकर्त्यांचे राज्य त्या ठिकाणी आले. एक लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी हजर होते. त्यातील ७० टक्के हे तरुण होते तसेच सर्व जाती-धर्मातील होते. मुख्यमंत्री हा धनगर समाजाचा माणूस झाला. जो कष्टकरी आहे इतरांच्या हिताची जपणूक करतो. समाजातील एक लहान वर्गाचा, जातीचा म्हणून त्यांनी काल मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे कशावरुन घडले तर तेथील कष्टकरी लोकांची एकजूट, लहान माणसांची एकजूट. मग ती एकजूट कर्नाटकामध्ये होऊ शकते तर देशातील अनेक राज्यांमध्ये कशी होत नाही हे बघण्याचा आता काळ आलेला आहे असेही म्हणाले.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *