Breaking News

लोढांच्या लव्ह जिहादवक्तव्यावरून अबु आझमी, गुलाबराव पाटील यांच्यात झुंपली अखेर अजित पवार यांच्या सूचनेनंतर वाद थांबला

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात ८ मार्च २०१३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खास महिला सदस्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत विशेष सत्र बोलविण्यात आले होते. यावेळी राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबाबत धक्कादायक विधान करत राज्यात लव्ह जिहादची १ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असल्याचे वक्तव्य लोढा यांनी केले होते. या वक्तव्यावरून आज समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी लोढा यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. तर लोढांच्या समर्थनार्थ मंत्री गुलाबराव पाटील पुढे आल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी यावरून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला.

पॉईंट ऑफ प्रोसिजरचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोढा यांच्या ८ मार्चच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले, लव्ह जिहाद ते म्हणतात पण आम्ही त्याला आंतरधर्मिय विवाह म्हणतो. अशा विवाहाप्रकरणी ३ हजार ६०० गुन्हे प्रत्यक्षात दाखल झालेले असताना मंत्री मात्र लव्ह जिहाद प्रकरणी १ लाख गुन्हे दाखल केल्याचे सांगत चुकीची माहिती रेकॉर्डवर आणत आहेत. त्यामुळे ती आकडेवारी काढून टाकावी अशी मागणी केली.

त्यावर भाजपाचे योगेश सागर यांनी मंत्री महोदयांनी कोणत्या धर्माचे नाव घेतले का, तुम्ही कोणाची वकील करताय असा सवाल करत आक्रमक भूमिका घेतली.

त्यानंतर आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी ज्या आधारे मुद्दा उपस्थित केलाय तो त्यांचा अधिकार आहे. पण तुम्ही मंत्र्यांना नोटीस न देता तो मुद्दा चर्चेला कसा आणताय असा सवाल केला. तसेच तुम्हाला जर लव्ह जिहाद प्रकरणी चर्चा करायची असेल तर त्याची तयारी आमची असल्याचे जाहिर केले.

याच दरम्यान, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मागणी केली की, मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागावी. आझमी म्हणाले की, मी मागणी करतो की लोढा यांनी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांना माफी मागायला सांगा. कारण लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील अबू आझमी यांची मागणी लावून धरली.

आझमी आणि आव्हाडांच्या मागणीनंतर शिवसेना आमदार गुलाबराव पाटील मैदानात आले. पाटील म्हणाले की, ज्यांना वाटत असेल की, लव्ह जिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्यांनी माझ्या गावी यावं. माझ्या गावातही अशी दोन प्रकरणं झाली आहेत. पाटील आव्हाडांना म्हणाले की, तुम्ही मुंब्र्यात राहता म्हणून बोलू नका. तुम्हाला त्यांची (मुस्लीम मतदार) गरज आहे म्हणून बोलत आहात.

दुसऱ्या बाजूला लोढांच्या समर्थनात आमदार आशिष शेलार मैदानात आले. शेलार म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी माफी का मागावी? ते हिंदू भगिनींसाठी बोलले म्हणून माफी मागावी का? असा सवाल केला.

लव्ह जिहाद प्रकरणावरून सभागृहातील वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहून अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न केला. पवार म्हणाले की, अध्यक्ष महोदय मला इतर विषयांवर बोलण्याची परवानगी द्यावी. मंगलप्रभात लोढांनी जो विषय़ मांडला तसेच जितेंद्र आव्हाड, गुलाबराव पाटील, आशिष शेलार यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातलं योग्य काय ते घ्यावं आणि अय़ोग्य गोष्टींना बाजूला काढून पुढचं कामकाज सुरू करावं.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *