Breaking News

सुषमा अंधारे म्हणाल्या , हे तर विनोद तावडेनी फडणवीसांना चितपट …

२०२४ च्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी गाजण्यास आताशी कुठे सुरुवात झाली आहे. देशातील लोकसभा निवडणूकांचा पहिला टप्पा अर्थात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जूने राहिलेले हिशोब चुकते करण्याच्या नादात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या अंतर्गत कलहाच्या कारण पुढे करत एक्सवर एक ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांचे ते ट्विट चांगलेच चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.

२०१४ साली झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार विराजमान झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांना सिनियर असलेली मंडळी विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना त्यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात नंबर दोन आणि नंबर पाच-सहा क्रमांकाच्या खात्याचे मंत्री म्हणून काम करावे लागले.

त्यातूनच तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यातील दुरावा वाढीस लागला. तर दुसऱ्याबाजूला एकनाथ खडसे यांच्याबरोबरील सुप्त संघर्षही याच काळात चांगलाच वाढीस लागला. तर तिसऱ्याबाजूला गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे याही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे जाहिर केले. त्यामुळे भविष्यकालीन राजकारणात या तिन्ही पक्षांतर्गत नेत्यांकडून अपशकून होवू शकतो याची शक्यता गृहीत धरून देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांच्याकडील एका मंत्री पदाचा कार्यभार काढून घेत २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांची उमेदवारी कापली. तत्पूर्वी एकनाथ खडसे यांना मंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर २०२० मध्ये खडसे यांना पक्ष सोडून जाण्यास भाग पाडले. याशिवाय पंकजा मुंडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत परळी वैजनाथ मधून पराभूत करण्यास देवेंद्र फडणवीस यांनीच धनंजय मुंडे यांना मदत केल्याची चर्चाही राज्याच्या राजकारणात तेव्हा चांगलीच रंगली होती.

या सगळ्या घडामोडीत विनोद तावडे हे दिल्लीच्या वर्तुळात गेले आणि तेथे त्यांनी प्रयत्नपूर्वक आपले स्थानही मजबूत केले. आज महाराष्ट्रातील अनेक नियुक्त्या आणि तिकीट वाटपात विनोद तावडे यांनी दिलेल्या सल्ल्याचा मोदी-शाह यांच्याकडून विचार केला जात असल्याचे भाजपातच बोलले जात आहे. या सगळ्या घडामोडींचा धागा धरत सुषमा अंधारे यांनी निवडक वाक्यात ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी जळगाव चा उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणविसाना २-२ दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ..फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय..! असे सांगत एक प्रकारे विनोद तावडे यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या तेव्हाच्या राजकारणाचा वचपा तर काढल्याचे अप्रत्यक्ष दाखवून दिले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे यांना पुन्हा व्हाया दिल्लीमार्गे भाजपात प्रवेश दिल्यास जून्या राजकिय कुरघोडीचा वचपा खडसे हे काढल्याशिवाय राहणार नाहीत अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *