Breaking News

राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द प्रकरणी जयंत पाटील म्हणाले, लोकशाहीच्यादृष्टीने अत्यंत… देशात विरोधकांना वेगवेगळ्या मार्गाने चिरडण्याची पध्दत सुरू झाली

सुरत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आज अचानकपणे इतक्या तातडीने देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची अशी तडकाफडकी खासदारकी रद्द करण्याचा प्रसंग लोकशाहीदृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, या देशात विरोधकांना वेगवेगळ्या मार्गाने चिरडण्याची पध्दत सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचीही न्यायालयाने निर्णय दिल्यावर तडकाफडकी खासदारकी रद्द करण्यात आली. त्यावर न्यायालयानेच त्यांना न्याय दिला. त्यामुळे त्यांची खासदारकी वाचली आणि आज विरोधी पक्षाच्या खासदारांची खासदारकी रद्द करण्याची घाई झाली आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना आहेत ज्यामध्ये विरोधी पक्षात आहेत म्हणून त्याला अटक झालेली आहे. त्यांच्यावर आयटी, ईडी, सीबीआय, या यंत्रणांचा गरज नसताना वापर करण्याचे काम सुरू आहे. देशातील लोकशाहीच्या विरोधात सातत्याने सत्तेत बसणारी लोकं काम करत आहेत असा आरोपही केला.

या देशात व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम झाले आहे. आजपर्यंत या देशात अब्रू नुकसानीच्या नावाखाली सहा महिन्याच्या खाली शिक्षा झाल्याचे या ७० वर्षात कधी ऐकिवात नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावर शिक्षा होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे असे सांगतानाच राहुल गांधी यांना याविरोधात अपील करण्याची एकही संधी न देता हे काम झाले आहे. राहुल गांधींनी लोकसभेत येऊन बोलू नये हाच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसतोय असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

लोकसभेचे दार राहुल गांधींना बंद करण्याचे काम दिल्लीत सत्तेत बसलेल्या लोकांनी केले. भारतात अशा पद्धतीच्या वागणुकीला देशाने नेहमी शिक्षा केली आहे. त्यामुळे या निर्णयामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय भारतीय लोकशाही व लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारी जनता स्वस्थ बसणार नाही असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

निवडणुकांसाठी अवघा एक वर्षाचा काळ राहिला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या मागे देशातील लोक उभे राहू नयेत याचा आटोकाट प्रयत्न सुरु असावा, त्याचा हा एक भाग आहे. मात्र या गोष्टीची प्रतिक्रिया फार वेगळी येईल आणि देशाची जनता राहुल गांधींच्या मागे उभी राहिल असा दावाही जयंत पाटील यांनी बोलताना केला.

भाजपा हा पक्ष नसून निवडणुक जिंकण्याचे यंत्र आहे, असा टोला लगावतानाच केवळ निवडणुका जिंकण्याच्या मोडमध्ये भाजपा असतो. लोकांची सेवा करणे अथवा लोकहिताचे निर्णय घेणे यापेक्षा विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे काम देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरु आहे. मात्र देशातील सर्व विरोधी पक्ष यामुळे अधिक ताकदीने संघटीत होतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *