Breaking News

सध्या शाल पांघरूण मुन्नाभाई फिरतोय, केमिकल लोच्या झालेला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र

परवा मला एक शिवसैनिक भेटला त्याने मला विचारले की लगे रहो मुन्नाभाई चित्रपट पाहिला का? मी विचारला थोडा बघितला. तर त्यावर तो म्हणाला की, त्यात संजय दत्तला सारखे महात्मा गांधी दिसत असतात. तसे हल्ला काही जण शाली पांघरूण फिरताना दिसत आहेत. अरे मग त्यांना भ्रम झाला असेल तर त्यांना भ्रमात राहु दे ना असे सांगितल्यावर मग तो पुन्हा म्हणाला मग साहेब तुम्ही पिक्चरचा शेवट पाहिला नाही वाटतं त्यात शेवटी दाखवलंय शेवटी संजय दत्तला कळतं की डोक्यात केमिकल लोच्या झालाय ते तसे आजकाल काही जणांच झालेले आहे. त्यामुळे भगवी शाल पांघरूण काही जण फिरतात. त्यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झालाय असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या सभेत ते बोलत होते.

संभाजीनगरमध्ये ओवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवून आला. यांची ए टीम, बी टीम, सी टीम काम करतेय. कुणालातरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्यातरी हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा द्यायची आणि मजा घेत बसायचं. म्हणजे काय कारवाई झाली की त्यांच्यावर होणार आणि आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य.

यांना झेडप्लस सुरक्षा. टिनपाटांना सुरक्षा देत आहेत. तिथे काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही, पण इथे भोकं पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा देत आहेत. कुणाला वाय प्लस, कुणाला झेड प्लस. काय बापाचा माल आहे तुमच्या? लोकांचा पैसा आहे तो. ज्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे, त्यांना देत नाही. ही असली गळकी टिनपाटं काय उपयोगाची तुम्हाला. टिनपाट सभ्य शब्द बोललो, टमरेलच बोलायचं होतं असे सांगत त्यांनी भाजपावर टीका करत म्हणाले की, काहीजण विचारतायत औरंगाबादचे नामांतर कधी अरे मी मुख्यमंत्री म्हणून औरंगाबादचे संभाजीनगर असे बोललोय. त्यामुळे नामांतराची काय गरज असा सवाल करत संभाजी नगर ते आहेच असे स्पष्ट करत या वादावर पडदा टाकला.

काँग्रेससोबतर असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही. मी विधानसभेत बोललोय. सत्ता असो वा नसो, परवा नाही. आमचं हिंदुत्व तकलादू नाही, ते खरं आहे. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटलं का, कधी नेसलं, कधी सोडलं. सोडायला लाज तुम्हाला नसेल वाटत, पण हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो. तुमच्यासारखं सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही. तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर दगा, तुम्ही सकाळची शपथ घेतली ते काय केलं. तो तुमचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून गुणगान केलं असतं असं वाटतं का तुम्हाला? अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

तुम्ही एनडीएत किती पक्ष जमवले होते? एनडीएक ३०-३५ लोक होते. नितीन गडकरींना विचारलं ही लोकं कोण? ते म्हणाले एनडीएतले सहकारी. काहीकाहींचा एकही खासदार नव्हता. नितीश कुमारांना संघमुक्त भारत करायचा होता. त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसताय का? गेल्या आठवड्यात ते म्हणाले हे भोंगा वगैरे सगळं बकवास आहे. घातलं तुमच्या भोंग्यात त्यांनी पाणी. हिंमत आहे का तुमची नितीश कुमारांसमोर बोलायची. ते म्हणाले हे चाळे मी नाही करणार इकडे. ज्याची त्याची पूजा ज्यानं त्यानं करायची असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपानं मुफ्ती मोहम्मद सैद यांच्याशी सरकार स्थापनकेलं होतं. ते भारत माता की जय म्हणतात का? की तुमच्या कानात वंदे मातरम बोलतात? म्हणे तिकडे आम्हाला आव्हान दिलं होतं की निवडणुका कशा होतात हे बघतो. म्हणून निवडणुका घेऊन दाखवल्या. नंतर सरकार स्थापन करून दाखवलं. पण मुफ्ती मोहम्मदसोबत तुमचा मंत्री पत्रकार परिषदेत होता. तो म्हणाला काश्मीरमधल्या निवडणुका शांततेत पार पाडू दिल्या म्हणून मी पाकिस्तान, हुर्रीयत आणि दहशतवाद्यांना धन्यवाद देतो. मग नेमकं तुम्ही कुणाला काय दाखवलंत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

अडवाणींच्या मुलाखतीचा व्हिडीओ आहे. त्यांनी सांगितलं जी लोकं चढली होती, ती मराठी बोलत होती. मग मी प्रमोद महाजनांना सांगितलं की त्यांच्याशी बोल. पण त्यांचंही ते ऐकत नव्हते. अशी मराठी माणसं दुसरी कोण असतील? बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांना सांगितलं की साहेब बाबरी पाडली. ते म्हणाले काय सांगतो. बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला. त्यांनी उचलून विचारलं मग? जर शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. फोन ठेवल्यावर मला म्हणाले ही कसली याची औलाद. जे लोकांना कारसेवा करायला बोलवत आहे. हे असलं पुचाट नेतृत्व आहे. नेतृत्वाचं लक्षण हेच असतं. जो नेता लोकांना भडकवून त्याने सांगितलेलं काम केल्यावर जबाबदारी झटकतो, तो नेता असूच शकत नाही. हेच काम भाजपानं केलंय. सुंदरसिंग भंडारी तेव्हा हेच म्हणाले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

आम्ही हिंदू आहोत की नाही, हे ठरवणारे तुम्ही नाहीत. तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला, तुम्ही हिंदुत्वाचा विकार करताय असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शरद पवारांवर एका बाईने विचित्र कॉमेंट केली. घरी आई-वडील कुणी आहे का? संस्कार काही होतात की नाही? काहीही झालं, तरी बाई तुझा संबंध काय? कुणाबद्दल बोलतेयस. काय बोलतेयस. जर हे तुझं वक्तव्य असेल, तर तुझी मुलं उद्या काय होणार? हा सुसंस्कृतपणा आपल्या महाराष्ट्रातून, देशातून जात चाललाय. ती संस्कृती संस्कार म्हणजे हिंदूत्व आणि ते आपल्याला राखायचाय असे सांगत केतकी चितळेने केलेल्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया व्यक्ती केली.

भाजपाकडून जाणीवपूर्वक जणूकाही महाराष्ट्रात भंगार राज्य चाललंय असं सुरू आहे असे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता हे दाऊदच्या मागे चाललेत. दाऊद उद्या म्हणााला मी भाजपात येतो, तर उद्या मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. बघ, ईडी वगैरे मागे लागतं. आमच्यासोबत ये, तुला मंत्री बनवतो. उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील आणि सांगतील दाऊद आमचा गुणाचा पुतळा आहे असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अशी चित्र-विचित्र भानगडी करणारी माणसं बघितल्यानंतर हे स्वत:ला हनुमान पुत्र म्हणवू तरी कसे शकतात. ज्या हनुमानाने पेटत्या शेपटीने लंका जाळली होती, तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होतात. तुमची वितभर नाही, कित्येक मैल पळापळ झाली होती. हनुमान पुत्र वगैरे शब्द तुमच्या तोंडी शोभत नाहीत असी टीकाही त्यांनी केली.

राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा ना. सॉसचा फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं की याला केंद्राची सुरक्षा असताना याच्यावर हल्ला झालाच कसा? सुरक्षा तुम्ही दिली होती ना? मग आम्हाला काय विचारताय? सॉसची बाटली दिली कुणी त्यांना? असा सवाल करत

घशाची खाज खाजवायची कशी म्हणून हे बोलून घेतात. पण आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही. एक तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही हे आमचं हिंदुत्व आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सत्ता मिळत नाही म्हणून तुमचं एकतर्फी प्रेम चाललंय. मग वाटतं, हे कोणत्या दिशेने चाललेत? एकतर्फी प्रेमात प्रेयसीला विद्रूप करण्याचे प्रकार घडतात. तसं यांचं एकतर्फी प्रेम आहे आणि हे महाराष्ट्राला विद्रूप करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *