Breaking News

मोदीलाट ओसरल्याने पवारांसह अनेक मातब्बर निवडणूकीच्या रिंगणात?

शरद पवार, मुत्तेमवार, शिंदे, चव्हाण यांच्यासह अनेकांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहीलेला असतानाच भाजपच्या मोदीलाटेच्या वाटवटळीतून आपले राजकीय जहाज वाचविलेल्या आणि बुडालेल्या अनेक नेत्यांनी आता पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

२०१४ साली लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत काँग्रेस विरोधी वातावरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वकृत्व शैलीमुळे अवघ्या देशावर मोदी लाटेचे भरते आले होते. त्यामुळे या वावटळीत काँग्रेसमधील सुशीलकुमार शिंदे, विलास मुत्तेमवार, एकनाथ गायकवाड, सतीश चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यावेळी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली. तर त्यांच्या पक्षाचे छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदार जे लोकसभा निवडणूकीत आपले नशीब आजमावत होते. त्या सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले.

त्यानंतरही राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी निवडणूक राजकारणातून संन्यास घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. परंतु मागील पाच वर्षात पुलाखालून मोठ्याप्रमाणावर पाणी वाहून गेल्याने आणि केंद्र-राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात असंतोष, नाराजी वाढत चालली आहे. त्यामुळे भाजपच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

शरद पवारांनी तर सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु केले आहे. तर सोलापूर लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी सकाळच्या मॉनिंग वॉकपासून प्रत्येक शक्य तितक्या पध्दतीने जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.

पुणे, नागपूर, मुंबईतील ६ जागा, मराठवाडा, विदर्भातील अनेक मातब्बर नेत्यांनी पराभूत झालेल्या ठिकाणच्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क सुरु केला आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुने चेहरे पुन्हा लोकसभेत पाह्यला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *