Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, अयोध्येतील त्या गर्दीत जाणार नाही

पक्ष सोडून जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांना परत पक्षात जागा नाही. ३० वर्षांपासून आम्ही हा पक्ष चालवत आहोत, त्यात इन्फो कंपोज याची जबाबदारी ही अजित पवारांवरच होती तेव्हा त्यांनी आपल्या कामावर जबाबदारीवर कधी लक्ष दिले नाही; आज देत आहे तर ठीक आहे अशी उपरोधिक टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली.

तसेच राज्यातील सत्ताकारणावर बोलताना शरद पवार म्हणाले, शिंदेंकडे बहुमत आहे ही गोष्ट खरी आहे, तसे एका पक्षाला स्पष्ट बहुमत आहे अशी स्थिती नव्हती भाजपा आणि नंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकत्र आल्यानंतर ते बहुमत झालेले आहे आणि त्यामुळे स्वच्छ, निर्मळ बहुमत आहे अशी क्लेम करायची परिस्थिती नाही, परंतु जर नंबर पाहिले तर ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे असा सूचक इशाराही दिला.

शरद पवार म्हणाले की, इलेक्शन जवळ आलेले आहेत. चिन्ह आणि नावाची अडचण आहे, त्यामुळे आम्हीही निवडणूक आयोगाकडून निकालाची प्रतीक्षा करत आहोत असेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर EVM मशीन संदर्भातला प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे, त्या प्रस्तावात EVM संदर्भात आमचा काही अनुभव आणि यासंबंधी काही दुरुस्त करण्याची शक्यता आणि हा निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हा लोकांना वेळ द्यावी, आमच्याशी चर्चा करावी, आमचं मत ऐकून घ्यावं आणि त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती, पण इलेक्शन कमिशनने वेळ देणे, चर्चा करणे या दोन्ही गोष्टी मान्य केल्या नाहीत असेही स्पष्ट केले.

अजित पवार यांच्याकडून सातत्याने वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत असल्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, वयाचा मुद्दा त्यांनी काढणं हे त्यांना योग्य वाटत असेल, तर त्यांनी तो काढला. त्याबाबत मी काही बोलू इच्छित नाही. आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं, तर मी संसदेत १९६७ साली आलो. कधी विधि मंडळ, तर कधी देशाचे संसद त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सत्तेबद्दल, काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनीही फार टीका केली नाही आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांबद्दल मला सांगता येईल. उदा. मोरारजी देसाई; प्राईम मिनिस्टर होते, संसदेत काम करत होते, त्यांच्या मागे लोकांचे बहुमत होते आणि त्यामुळे अशा गोष्टींवर बोलावे असे मला वाटत नाही असा उपरोधिक टोलाही अजित पवार गटाला लगावला.

बिल्कीस बानो यांच्या केस संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल झाला, ज्यात ७ व्यक्तींची हत्या आणि एका भगिनीवर अत्याचार याची सर्व पार्श्वभूमी ही गुजरातची आहे. निकालासाठी उशीर झाला पण, सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य घेतला. स्त्री वर्गाला आणि सामान्य माणसाला एक प्रकारचा आधार देण्याचे काम कालच्या निकालातून सिद्ध झाले आहे. गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की, हा निकाल महाराष्ट्र सरकारने घ्यावा आणि ही केस महाराष्ट्रात चालू झाली असेही शरद पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर व इतर पक्ष यांची संयुक्त बैठक आज दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीत साधारणतः आगामी निवडणुका संदर्भात एकत्रित काम कसे करावे यासंबंधीची चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीकडून या चर्चेला जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत, त्यांना मी सल्ला दिलेला आहे की, पक्षाच्या वतीने तुम्ही भूमिका मांडावी. यानंतरही बैठका होतील तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी असतील. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. प्रत्येक पक्षाची मागणी ही असतेच, पण निकाल हा प्रायोगिकच घ्यावा लागतो असेही स्पष्ट केले.

वंचितच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना युतीत सामील करून घेण्याची भूमिका आजच्या मीटिंगमध्ये पक्षाकडून गेलेले नेते मांडतीलच, परंतु इंडियाच्या मीटिंगमध्ये मी स्वतः असेलच तिथेही आम्ही भूमिका मांडू असे सांगत लोकसभेत आज काँग्रेसच्या जागा जास्त आहेत; काँग्रेस जास्त जागांवर जिंकूही शकते असे भाकितही केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, मी अनेक संस्थांमध्ये लाईव्ह अध्यक्ष आहे. मला लोकांनी २० वर्षांपासून कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून ठरवलेले आहे. यात तर काही राजकीय भूमिका नाही आहे. पाच सहा महिने उरलेले आहेत, आता आमचे फोन टॅप होत नाहीत का तेच पाहायचे आहे असा सवालही यावेळी उपस्थित केला.

अयोध्येतील राम मंदिर प्रश्नी बोलताना शरद पवार म्हणाले, राम हा श्रद्धेचा विषय आहे, या देशाच्या जनतेच्या हृदयात रामाचे स्थान आहे आणि ते कायमच राहील यात काही सांगण्याची गरज नाही. सरकारी किंवा महानगरपालिकेच्या बऱ्याच शाळांमध्ये रामावर निबंध किंवा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, याबद्दल शिक्षकांनी मला अर्ज केला आहे, अशा बद्दलचे कार्यक्रम शाळेत राबवणे हे योग्य नाही आणि त्यासाठी मुंबईचे पालकमंत्री खूप आग्रही असल्याचे मला समजले. हा देश सेक्युलर आहे, सर्वधर्म समभाव यासंबंधीची भूमिका आहे. हिंदू किंवा राम यासंबंधीची आस्था जेवढी आहे, तेवढीच मुस्लिम, इस्लाम, मोहम्मद पैगंबर किंवा ख्रिश्चन धर्माच्या येशु याबद्दलची आस्था आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे नव्या पिढीतल्या मुलांवर या प्रकारची भूमिका मनामध्ये बिंबवणे हे सेक्युलर देशामध्ये योग्य नाही. मी राम मंदिराच्या निमंत्रणाची वाट बघत नाही. आता तसाही तिथे मेळावा आहे, त्यामुळे त्या गर्दीत मी जाणार नाही, जेव्हा योग येईल तेव्हा नक्की जाईल असेही ठामपणे सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, इंडिया अलायन्स एकत्रित रित्या राहून देशाचे नेतृत्व करेल अशीच सर्वांची भूमिका आहे. आज देशाच्या सत्तेमध्ये जे लोक बसलेले आहेत, त्यांना शाहू, फुले, आंबेडकर यांच्या आयडॉलॉजीबद्दल काहीही इंटरेस्ट नाही. देशाच्या पंतप्रधानांचा देशाबाहेर झालेला अपमान आम्हाला सहन होणार नाही ते या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांची इज्जत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *