Breaking News

शरद पवार यांची टीका, मणिपूर सारखे राज्य सांभाळता येत नाही अन कर्नाटकात… कर्नाटकमधील ४० टक्क्याचे धोरण देशात राबविण्याचा काही जणांचा विचार

कर्नाटक निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहून इथल्या जनतेशी संवाद साधला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशात वेगळे चित्र आहे. निवडणूक कर्नाटकमधील आहे, परंतु संपूर्ण देशाचे चित्र पाहिले तर नवनवीन समस्या दिसत आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यात शांतता असणे गरजेचे आहे. मणिपूर येथे मागील सहा दिवस संघर्ष सुरु आहे, ज्यात ५४ विद्यार्थी आणि तरूण मृत्यूमुखी पडले. याठिकाणी सत्ता भाजपची आहे. ज्यांच्या हाती देश आहे त्यांना मणिपूरसारखे राज्य सांभाळता येत नाही. तर मतं मागण्यासाठी पंतप्रधान कर्नाटकात हिंडत आहेत. ते फिरत असताना काँग्रेस आणि विरोधकांना शिव्या देतात. खरंतर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या सत्तेचा वापर करून मणिपूर कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, पण त्यांचे लक्ष त्याठिकाणी दिसत नाही अशी टीका पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

तसेच शरद पवार म्हणाले, कर्नाटकमध्येही भाजपाचे राज्य आहे. खरंतर अनेक ठिकाणी भाजपा सत्तेत निवडून आलेला नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार फोडून त्यांनी सत्तांतर केले. मध्य प्रदेश आणि अशी अनेक राज्यं सांगता येतील जिथे धनाचा वापर करून माणसे फोडणे आणि त्यातून सरकार बनवणे ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. त्याला कर्नाटकही अपवाद नाही. म्हणून या देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे असे आवाहनही केले.

शरद पवार यांनी ४० टक्के चर्चेवर टीका करताना म्हणाले, कर्नाटकात सध्या चाळीस टक्क्यांसंबंधीच्या नवीन धोरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे धोरण संपूर्ण देशात राबवण्याची इच्छा काहींची दिसते. मात्र मिळालेली सत्ता ही सामान्य माणसाच्या हितासाठी वापरायची असते. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कर्नाटकात विरेंद्र पाटील मुख्यमंत्री होते. इतका स्वच्छ व्यवहाराचा आणि चांगला राज्य कारभार करणारा मुख्यमंत्री कर्नाटकने दिला होता. त्याच कर्नाटकची चर्चा संपूर्ण देशात चाळीस टक्क्यांचे सरकार म्हणून होत असेल तर एवढी कर्नाटकची बदनामी कोणीही केली नाही. त्याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे असा उपरोधिक टोलाही लगावला.

देशाला राज्यघटना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाला अशुभ दिवस म्हटले जाते. बाबासाहेबांनी देशाला केवळ घटना दिली नाही तर देशासाठी अनेक धोरणात्मक निर्णयही घेतले आहेत. अशा महान व्यक्तीबद्दल असे वक्तव्य होत असेल तर यातून कष्टकरी, कर्तृत्ववान आणि मागासवर्गीय वर्गाची बदनामी केली गेली, असे म्हणणे चुकीचे होणार नाही असे भाजपाप्रणित ट्रोल चालविणाऱ्यांवर शरद पवार यांनी केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, देशात काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला सन्मानाने जगण्याची स्थिती केली नाही तर हा देश कधी चालू शकत नाही. कर्नाटकात वीज, पाणी, शेती अशा सर्व गोष्टींमध्ये लक्ष द्यावे लागेल. एकेकाळी निपाणी हे नाव तंबाखूसाठी घेतले जायचे. याठिकाणी ऊसाचे पीक घेतले जाऊ लागले. इथल्या जनतेने उत्तमराव पाटील यांनी विजयी केल्यास ऊसाला अधिकची किंमत कशी मिळेल यासंबंधीचे मार्गदर्शन त्यांना निश्चित करू अशी ग्वाहीही दिली.

निवडणुकीत खऱ्या अर्थाने योग्य मार्गदर्शन हे ज्यांना आपल्याबद्दल आस्था आहे ते सर्व लोक करतात. यापूर्वी काकासाहेब पाटील यांना या भागातून आपण दोन वेळा निवडून जरी दिले असले तरी कुठे थांबायचे हे जर त्यांना कळलं नाही तर अपघात होतो. या निवडुकीत त्यांचा अपघात होईल यात शंका नाही. त्यामुळे आपले मत वाया जाऊ देऊ नका असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *