Breaking News

पवारांच्या त्या वक्तव्यावर पर्रिकरांच्या मुलाकडून नाराजी साहेब तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हती अशी उत्पल पर्रिकरांकडून भावना व्यक्त

मुंबई : प्रतिनिधी

राफेल विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला करार त्यावेळचे संरक्षण मंत्री स्व.मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हता. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. त्या वक्तव्याची गंभीर दखल घेत “माझे वडील हयात असताना आणि धैर्याने आजाराचा सामना करत असताना काही राजकीय नेत्यांनी त्यांचे नाव क्षुद्र राजकारणासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. पण आता ते आपल्यामध्ये नसल्यामुळेच कदाचित तुम्ही त्यांचे नाव घेऊन खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहात. एक ज्येष्ठ आणि सन्मानित राजकारणी म्हणून भारतातल्या जनतेला पवार साहेबांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती,” अशा स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी एका पत्रात आपले दुःख व्यक्त केले.

उत्पल मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून आपल्या वेदना जाहीर केल्या. त्यांनी पत्रात म्हटले आहे, “माझे वडील श्री मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचे आपले विधान वाचून मला आणि माझ्या कटुंबाला अपार दुःख झाले. राजकीय फायद्यासाठी धादांत असत्य पसरविण्याच्या इराद्याने माझ्या वडिलांचे नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे.”

त्यांनी पत्रात म्हटले आहे, “राफेल खरेदी व्यवहारामुळे मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परतले असे खोटारडेपणाने सुचविणे हा मनोहर पर्रिकर व गोव्याच्या जनतेचा अपमान आहे. माझे वडील आजाराचा सामना करत असताना ज्यांनी चौकशी करायचीही तसदी घेतली नाही, त्यांनी राजकीय चिखलफेकीसाठी त्यांचे नाव घेण्यास सुरुवात करावी हे दुःखदायक आहे.”

आपण अशा वक्तव्यांपासून दूर रहावे आणि मनोहर पर्रिकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या गोवा आणि भारतातील जनतेला शांतपणे त्यांच्या निधनाबद्दल शोक करू दे, असे कळकळीचे आवाहन उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांना केले आहे.

उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे, “आपण विधान केलेच आहे तर मला काही मूलभूत बाबी सांगू दे. माझे वडील एक अत्यंत प्रामाणिक व निस्पृह व्यक्ती होते, ज्यांनी गोव्यात असो नाही तर दिल्लीत, देशाच्या सर्वोच्च हितासाठीच काम केले. श्री पर्रिकर संरक्षणमंत्री म्हणून काम करण्यास दिल्लीला गेले आणि त्यांनी सर्वार्थाने उत्तम काम केले. त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले व त्यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल. त्यापैकीच एक निर्णय राफेल विमानखरेदीचा होता. ते या निर्णयाचे मुख्य शिल्पकार होते. नंतर जेव्हा गोव्याच्या जनतेला ते त्यांच्या सेवेसाठी परत हवे होते, त्यावेळी श्री पर्रिकर कर्तव्यबुद्धीने परतले आणि त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत गोव्याची सेवा केली.”

एक माजी संरक्षणमंत्री म्हणून आपल्या शूर सैनिकांना शस्त्रसज्ज करण्याचे किती महत्त्व आहे, हे आपण जाणत असाल याची मला खात्री आहे. आपल्या सशस्त्र दलांना बळकटी देण्याच्या प्रयत्नात अडथळा आणण्यासाठी खोडसाळ अपप्रचार मोहीम सुरू असून आपणही त्याचे भाग झालात, हे क्लेषकारक आहे, असेही उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे.

Check Also

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *