Breaking News

संदीप क्षिरसागर यांनी सांगितली आपबितीः फडणवीस म्हणाले, दोन दिवसात एसआयटी…

राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाप्रश्नावरून आक्रमक रूप धारण केल्याने काही दिवसांपूर्वी बीड शहर आणि माजलगांव येथील मोठ्या प्रमाणावर जाळपोळीच्या घटना घडल्या. याच जाळपोळीच्या घटनांमध्ये शरद पवार समर्थक आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घराला आणि अजित पवार गटाचे समर्थक आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावत त्यांच्या घरासमोरील वाहनांही लक्ष्य करण्यात आली. या सर्व प्रकरणी आमदार संदीप क्षिरसागर यांनी विधानसभेत पोलिस प्रशासनावर आरोप करत या सर्वांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला.

शरद पवार गटाचे गटनेते जयंत पाटील यांनी याच मुद्यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत या जाळपोळीच्या घटनांच्या मागे नेमके कोण होते याचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना कधी करणार असा सवाल उपस्थित केला.

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यात माजलगाव व बीड शहरात काही ठिकाणी जमावाकडून तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये लोकप्रतिनिधींचे निवासस्थाने सुद्धा जाळण्यात आली. तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या दोन्ही शहरातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन दिवसात विशेष तपास पथकाची (स्पेशल इन्वेस्टीगेटींग टीम) स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजलगाव व बीड येथील घटनेप्रकरणी ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळालेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३० आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरती मोठे गुन्हे दाखल आहेत. अजूनही माजलगाव प्रकरणात ४० गुन्हेगार व बीड प्रकरणात ६१ गुन्हेगार फरार आहेत. त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींचे मोबाईल लोकेशन, व्हाट्सॲप मेसेजेस तपासण्यात आले आहे. फरार आरोपी विरोधात देखील सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याबाबतही चौकशी करण्यात येत आहे, हे सर्व प्रकरण शासनाने गांभीर्याने घेतले असल्याचे सांगितले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1735628124115906790

बीड जिल्ह्यातील हा प्रकार अत्यंत गंभीर होता. अशा घटनांना राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. पोलिसांनी कारवाई केली नसती, तर ही घटना आणखी गंभीर झाली असती. जमाव जास्त व पोलिसांची कुमक कमी असल्यामुळे घटनेवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना कसरत करावी लागली. जमाव हा विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी होता. माजलगाव येथे आधी पोलीस कुमक गेली, त्यानंतर बीड शहरातील घटना सुरू झाली. या घटनेमध्ये चूक नसताना अटक झालेली असल्यास त्यांना बाहेर काढण्यात येईल. मात्र चूक असलेल्या कोणत्याही आरोपीला माफ केल्या जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *