Breaking News

रामदेव बाबांच्या व्यावसायिक भागीदाराकडे नांदेडच्या गुरूद्वाराची जबाबदारी स्थानिकांना डावलल्याने शीख बांधवांमध्ये नाराजी

मुंबईः प्रतिनिधी
योगविद्येकडून व्यवसायात उतरलेले रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीतील व्यावसायिक भागीदार भुपेंद्रसिंह मिनहास यांची नियुक्ती नांदेडच्या गुरूद्वारा सचखंड बोर्डाच्या अध्यक्ष पदी राज्य सरकारने नुकतीच केली. ही नियुक्ती करताना स्थानिक शीख बांधवाना डावलत १७ सदस्यांचे असलेले बोर्ड ९ सदस्यांवर आणल्याचा आरोप गुरूद्वारा सचखंड बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंह खंडासिंह कामठेकर यांनी केला.
गुरूद्वारा सचखंड बोर्डाच्या अध्यक्षपदी यापूर्वी मुंबईचे आमदार सरदार तारासिंह होते. त्यांचा कार्यकाल नुकताच संपला. त्यांच्या कार्यकाळात बोर्डावर १७ सदस्य होते. तसेच हे सर्व सदस्य नांदेडसह राज्यभरातील होते. परंतु सरदार तारासिंह यांचा कार्यकाळ संपताच त्यांच्या ठिकाणी पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे आणि उद्योगपती रामदेव बाबांचे व्यावसायिक भागीदार भुपेंद्रसिंह मिनहास यांची नियुक्ती केली. तसेच १७ वर असलेली सदस्य संख्या ९ वर आणत त्यावरील सदस्यांची नावे जाहीर केली. या सदस्यांमध्ये एकही स्थानिक शीख बांधव नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नांदेडमधील गुरूव्दाराचा कारभार हा १९५६ सालच्या कायद्याप्रमाणे चालतो. परंतु राज्य सरकारने २०१५ साली बोर्डाच्या कायद्यातील कलम ११ मध्ये बदल केला. वास्तविक पाहता गुरूव्दाराचे कामकाज पंचप्यारेच्या माध्यमातून चालविले जाते. तरीही सरकारने कारण नसताना त्यात बदल करत सरदार तारासिंह यांची बोर्डावर अध्यक्ष म्हणून निवड केली. आता तर स्थानिकांना बाजूला सारत संपूर्ण बोर्डच जाहीर केल्याने शीख बांधवांमध्ये नाराजी पसरली असून हा बोर्डच बरखास्त करावा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
राज्य सरकारने काढलेल्या नियुक्ती अध्यादेशाची नांदेड येथे होळी करण्यात आल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *