Breaking News

राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपकडून ७ वा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपैकी एकाचा उमेदवार अडचणीत

मुंबई : प्रतिनिधी

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. तर भाजपकडून तीन जागांसाठी चवथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना उमेदवारी देत विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा यापैकी एका पक्षाचा उमेदवार धोक्यात आणला आहे.

या सहाही जागांसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत. तसेच प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान ४२ मतांची आवश्यकता लागणार आहे. यापैकी काँग्रेसकडील ४२  आमदारांपैकी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले. तर नितेश राणे, कालीदास कोळंबकर हे काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील याचा कोणताही भरवसा नाही. त्यामुळे काँग्रसकडे फक्त ३९ मते शिल्लक राहतात. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार कुमार केतकर यांना विजयासाठी तीन मते कमी पडत आहेत. त्यामुळे काँग्रेसची सारी भिस्त ही अपक्ष आमदार व छोट्या पक्षांच्या आमदारांवर राहणार आहे.

तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत ४१ सदस्य असून त्यांचे उमेदवार वंदना चव्हाण आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि बंडखोर आमदार रमेश कदम हे दोघेही तुरुंगात आहेत. यापैकी भुजबळांची तब्येत ठीक नसल्याने ते राज्यसभेसाठी मतदान करतील की नाही याबाबत शंका आहे. तर रमेश कदम हे राष्ट्रवादीच्या उमेदवार करतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही ३ मतांची जुळवाजळव करावी लागणार आहे.

याउलट शिवसेनेचे विधानसभेत ६३ आमदार असून त्यांच्याकडून फक्त अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे ४२ मते मिळून ते सहजी विजयी होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे २१ अतिरिक्त मते असून  ती मते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळण्याची शक्यता कमी आहे.

तर भाजपचे १२२ आमदार सभागृहात आहेत. त्यामुळे भाजपने उभे केलेले उमेदवार प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन हे उमेदवार सहज विजयी होणार आहेत. तरीही शिवसेनेची अतिरिक्त मते आणि अपक्षांची ८ ते १० मते मिळून भाजपचा चवथा उमेदवार सहज विजयी होवू शकतो.

याबाबत काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पतंगराव कदम यांच्या निधनामुळे मतांचा कोटा कमी झालेला आहे. आता कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी ४२ मतांची आवश्यकता लागणार आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारासाठी छोट्या पक्षाच्या मदतीने मतांची पुरेशी बेगमी केली असून कुमार केतकर हे सहज विजयी होतील अशी आशाही व्यक्त केली.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *