Breaking News

काँग्रेसच्या आघाडीत मनसे? राज ठाकरे यांच्या भेटीला काँग्रेसचे माणिकराव ठाकरे

मुंबईः प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपप्रणित आघाडीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला थेट आघाडीत सहभागी न करता स्वतंत्र प्रचार करण्यास भाग पाडले. तरीही भाजपचा किमान राज्यात पराभव करता आला नाही. त्यामुळे अखेर आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राज ठाकरेंनी मोदी आणि शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्याबाबत आपण समाधान व्यक्त करत त्यांना भेटलो असे माणिकराव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला देशभरात दारूण पराभव सहन करावा लागला. महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. या पराभवाच्या धक्क्यातून सावरत आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जाते आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी जेव्हा यासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा ही एक सदीच्छा भेट होती हे सांगत याबाबत फार काही बोलणे माणिकराव ठाकरे यांनी टाळले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *