Breaking News

भाजपा- राष्ट्रवादी युतीबाबत त्या दोघांचे वक्तव्य संभ्रम व अविश्वास निर्माण करण्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा पलटवार

२०१७ मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होणार होती. तसेच त्यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याचे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार आशिष शेलार यांनी करून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेची माहिती उघडकीस आणली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुनगंटीवार आणि शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्या दोघांचे वक्तव्य म्हणजे संभ्रम व अविश्वास निर्माण करण्याचा प्रकार असल्याची टीका केली.
सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी २०१७ मध्ये भाजप व राष्ट्रवादी युतीबाबत केलेले वक्तव्य हा महाविकास आघाडीत संभ्रम व अविश्वास निर्माण करण्याचा केविलवाणा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केला.
२०१४ ते २०१९ महाराष्ट्रामध्ये भाजप व शिवसेनेचे सरकार होते आणि २०१७ मध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तीन पक्षाचे सरकार बनावे असा कुठलाही संविधानिक पेचप्रसंग निर्माण झाला नसताना आशिष शेलार व सुधीर मुनगंटीवार यांनी हे विनोदी वक्तव्य कसे काय केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे अनेक मुहूर्त गेल्या अडीच वर्षांमध्ये आले आणि गेले तरी देखील महाविकास आघाडी भक्कम आहे असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकार कारभार प्रामाणिकपणे करीत आहे. त्यामुळे सरकार अस्थिर करण्याचा अजून एक केविलवाणा व कुटील डाव म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांच्या विरोधात संशयाचे वातावरण निर्माण करणे या एकमेव उद्देशाने आशिष शेलार व सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा व राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचे वक्तव्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
२०१९ च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या युतीबाबतच्या चर्चेने जोर धरला होता. त्याचबरोबर काँग्रेसबरोबरील युतीतून राष्ट्रवादी बाहेर पडणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चर्चेच्या फेऱ्या झडल्याची अधिकृत माहिती पुढे आली नाही. मात्र त्यानंतर मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मात्र भाजपाकडून बाहेर आली होती. परंतु त्यानंतर काय झाले याविषयी चर्चाही बाहेर आली नाही. मात्र याविषयी अमित शाह यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सगळ्याच गोष्टी काही सांगायच्या नसतात. राजकारणात काही गोष्टी गुप्तही ठेवाव्यात लागतात असे सूचक विधान करत अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *