Breaking News

यांचे निर्णय… यांची धोरणं चुकल्याने राज्य संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सरकारवर टीका

जालना: प्रतिनिधी
आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे निर्णय आणि धोरणं चुकली आहेत त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा फटका बसत आहे. राज्य मोठ्या संकटात आहे असं असताना यांना झोप तरी कशी लागते असा सवाल करतानाच यांना खरा आदेश देवून टाका असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील जाहीर सभेत केले.
राज्यासमोर एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी आत्महत्या. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. त्याच्या डोक्यावर मोठे कर्ज आहे, शेतमालाला भाव नाही त्यामुळे तो आत्महत्या करत आहे. सरकार याची दखल घेत नाही याबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापूर आला लोकांचे मोठे नुकसान झाले. सोन्यासारखी पिके बरबाद झाली. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी केली. लेका त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला तू हवाई दौरा कसला करतो ? असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.
जालन्यात दुष्काळ पडला होता. मोसंबीचे नुकसान झाले होते. तात्काळ या भागाला निधी दिला. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. आजचे राज्यकर्ते तशी भूमिका घेताना दिसत नाही. मग अशा राज्यकर्त्यांना बदलण्याची गरज आहे ना असा सवालही जनतेला त्यांनी केला.
आघाडी सरकार असताना या भागात नदीवर बॅरेजस बांधले. ते बॅरेजस बांधले म्हणून आज लोकांना पाणी मिळतंय. त्यामुळे शेती चांगली झाली आहे. हेलिकॉप्टरमधून नदीकाठी चांगली ऊसाची पिकं दिसली की मला समाधान वाटतं येथील शेतकरी खूश आहे अशी आत्मियता त्यांनी शेतकऱ्यांबद्दल व्यक्त केली.
या भागात राजेश टोपे यांनी विकास केला. शाळा सुरू केली आहे. मुलांना शिक्षण देत आहेत पण रोजगार कुठाय. या सरकारने सुशिक्षित बेरोजगारांची फौज उभी केली आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.
आजचा तरुण शांत आहे. उद्या ही तरुण मंडळी संतप्त झाली तर हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
काही जण आज पक्ष सोडून जात आहे.मराठवाड्यातील काही नेते सोडून गेले आहेत. म्हणतात आम्हाला विकास करायचा आहे. अरे तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली तेव्हा काय केले ? या जनतेने मोठे केले, पक्षाने हवं ते दिले. त्या व्यासपीठाशी गद्दारी करता ? एकदा काय उन्हाळा आला तर पळापळी सुरू केली आहे. या साऱ्यांचा विकास आपण मिळून करू. जास्त दिवस राहिले नाही. मतपेटीत आपले मत टाकून आपण यांना उत्तर देऊ असा स्पष्ट इशारा त्यांनी पक्षांतर केलेल्या लोकांना दिला.
बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैलं वाकडे चालतात. मग आपण त्यांची जागा अदलबदल करतो तरी तो नाठाळ बैल तसा वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो.आज काही बैल तसेच झाले आहे.मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा असे आवाहन त्यांनी शेवटी जनतेला केले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *