Breaking News

महामोर्चात अजित पवार यांचा सवाल, या मागचा मास्टरमाईंड कोण? शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयीच्या बेताल वक्तव्यावरून साधला निशाणा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरली होती. या मोर्च्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे भाजपा सरकारवर टीकास्र सोडले.

यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, ही वेळ का यावी? महापुरुषांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं सुरू आहे. त्याला विरोध केलं पाहिजे. शिवाजी महाराज आपलं दैवत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक महापुरुषांची नावं आपल्याला घेता येतील. पण यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याचं काम कशासाठी चाललंय? कोण यामागचा मास्टरमाईंड आहे? का हे थांबत नाहीये असा सवाल करत ते पुढे म्हणाले, महापुरुषांचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी, महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांच्या मनात धडकी भरवण्यासाठी आपण हा मोर्चा काढला असल्याचे स्पष्ट केले.

काही महिन्यांपूर्वी जे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. दुर्देवाने महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला तरी जेव्हा महाराष्ट्रावर संकट असतं, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उटतो आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, याची साक्ष देणारा हा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आज कार्यकर्ते मोर्च्यासाठी दाखल झाले आहेत. मुळात ही वेळ यायला नको होती. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत जी अपमानस्पद विधानं केली जात आहेत, त्याला कुठं तरी विरोध केला पाहिजे. शिवराय आपले दैवत आहेत. शाहू, फुले आंबेडकर आपला अभिमान असताना त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्याचे काम कशासाठी सुरू आहे? कोण यामागे सुत्रधार आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

चुकीचे विधान एखाद्या वेळेस होऊ शकते, त्यानंतर माफी मागणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही आपली पंरपरा आहे. मराठी माणसावर तसे संस्कार झाले आहेत. मात्र, आज तसे होताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर दुसरे मंत्री बोलतात. कोणी महापुरुषांच्या महान कार्याला भिकेची उपमा देतात. जनाच नाही तर किमान मनाची लाज वाटायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राज्यपालांना हटवलं पाहिजे. दोषी असणाऱ्या आमदारांना हटवलं पाहिजे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पावलं उचलायला हवीत. त्यासाठी कायदा केला तरी चालेल, विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देतील असेही त्यांनी सांगितले.

बेळगाव, निराणी, कारवारसह सीमाभागातील ८६५ मराठी गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रातील गावं अचानक कर्नाटकमध्ये जाण्याचं का जाहीर करू लागले. याचं टूलकिट कुठून जारी झालं? याचा नागरिकांनी विचार करायला हवा. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये काम केलं. पण कधी सीमाभागातील गावं असं म्हणत नव्हती. देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळा आहे. या मातीला शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? हे रान उठवण्याचं काम कुणी केलं? हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सहा महिन्यात महापुरुषांचा अवमान व्हायला लागलाय. महाराष्ट्रातील गावं शेजारी राज्यांत जाऊ असं म्हणायला लागली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वेगवेगळे दावे करायला लागले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कुणी ट्वीट केलं? हे समोर यायला हवं.

महाराष्ट्र सरकारने ७ डिसेंबरला कर्नाटक बँकेत खाती उघडण्याचा जीआर काढला आहे. त्यांना काही वाटायला हवं. तुमचं पुतना मावशीचं प्रेम सगळ्यांना कळालं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही. आपण एकजूट दाखवून सरकारच्या चुकीच्या निर्णयांना थांबवण्यासाठी सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करायला हवं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *