Breaking News

महामोर्चात उध्दव ठाकरेंचा इशारा, ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर… बाळासाहेबांची शिकवण घेऊन जाऊ म्हणणारे तोतया

महाविकास आघाडीचा महामोर्चा सीएसटी येथे पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल, भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, तर माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असा गर्भित इशारा दिला.

महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या ‘महामोर्चा’त उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रानंतर असे दृष्य देशाने नव्हे तर जगाने पाहिलं असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.

सर्वपक्ष एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाही आहेत. स्वत:ला बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जाणारे तोतये समजतात. पण, त्यांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभीमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही. असं कोणी करण्याचा प्रयत्न करेन, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही, कारण ही शिवसेना आहे, असेही ते म्हणाले.

एवढी ताकद एकवटल्यानंतर कुणाची काय ब्याद आहे की मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लचका तोडणार. या गर्दीमुळे महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडले पाहिजेत. जर ते उघडणार नसतील, तर ते कधीच उघडू नयेत, अशी आपण प्रार्थना करुयात. जा, निघून जा इकडनं असा टोलाही भाजपाला आणि शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

तिसरे आपले मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांनी तर आग्र्याहून महाराजांची सुटका झाली, त्यांची बरोबरी या खोकेवाल्यांशी केली आहे. कुठे तुम्ही, कुठे शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि यांनी खोके घेऊन, लांडीलबाडी करून, पाठीत वार करून, तेही आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वत:च्या आईच्या पाठीत नव्हे, कुशीत वार करून सरकार स्थापन केलं, त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांशी करताय? असेही ते म्हणाले.

यांच्या मंत्रीमंडळात कसे मंत्री आहेत? एक तर बौद्धिक दारिद्र्य असणारे आहेत. दुसरे सुप्रिया सुळेंचा अपमान करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीये. हे लफंगे आहेत. महाराष्ट्र लुटायला आले आहेत. शिवाजी महाराजांनी मातेबद्दल, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण दिली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल हे बोलतायत. जर ते नसते, तर आज आपण कुठे असतो त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी ‘भीक’ शब्द वापरून दाखवून दिलं आहे. त्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन केली पण ते डगमगले नाही. त्यांच्यामुळे आपण शाळेत गेलो. आपण तसे गेलो नसतो, तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे. काही शब्दांता अर्थ असतो की नाही अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांनी केली.

मी तर त्यांना राज्यपालच मानत नाही. त्या पदाचा आम्ही नक्की मान राखतो. त्या पदावर कुणीही बसावं आणि कुणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल कोण असावा? फक्त केंद्रात जो बसतो, त्यांच्या घरी काम करणारा माणूस कुठेतरी सोय म्हणून पाठवायचा नसतो. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. त्यांनी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणणारे तोतये… खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही आणि असं जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण असल्याचे सांगत भाजपाला त्यांनी गर्भित इशाराही दिला.

अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसतायत, ही महाराष्ट्राची ताकद आहे. फक्त महाराष्ट्रद्रोही इथे नाहीयेत. महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजवर आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्यानंतर असं दृश्य सगळ्या जगानं पहिल्यांदा पाहिलं असेल असेही ते म्हणाले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *