Breaking News

भाजपा म्हणते, राजकिय अस्तित्वाच्या संकटामुळे मविआचा महामोर्चा भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे केली.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आ. माधुरी मिसाळ व आ. सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहेत. भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची ताकद भारताकडे मोदीजींच्या नेतृत्वात आहे. तो देश भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया अशी कृती करू शकत नाही. दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात आहेत.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुरू झाली असून हे असेच काम चालू राहिले तर आपले राजकीय अस्तित्व संकटात येईल, अशी भीती महाविकास आघाडीला वाटते व तेच त्यांच्या मोर्चामागचे खरे कारण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आता राज्य गतीने पुढे जात आहे, यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे अशी टीका केली.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेषभूषा करून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाला होता. ही महाविकास आघाडीची संस्कृती आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील अशी टीकाही त्यांनी केली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *