Breaking News

अजित पवार म्हणाले, या सरकारच्या काळात पोलिस आणि मंत्रालय प्रशासनावर दबाव

काल ठाण्यात गेलो होतो तिथे अनेक लोकांनी भेटून सांगितले इथे पोलीस ऐकून घेत नाही. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात आणि तसे पोलीस बोलून दाखवत आहेत आमच्यावर दबाव आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही असे सांगतानाच अशा तणावाखाली पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी तणावाखाली काम करतात त्यांना डायरेक्ट आदेश सीएम कार्यालयातून येतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

जनतेचा विश्वास पोलिसांवर आजही आहे. कोरोनाच्या काळात आम्ही स्वतः पाहिले आहे. पोलिसांना जनतेने सहकार्य केले होते.आता चार महिन्यात तुमच्या – माझ्या राज्यात चाललेली जी परिस्थिती आहे ती अशीच जर राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पोलीस आणि सचिवांनी आपली भूमिका कणखर मांडली पाहिजे. भारतात आपल्या राज्याचा नावलौकिक आहे तो ढासळू देता कामा नये. पण काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी जे जवळचे असतात त्यांनी जाऊन हे लवकर दुरुस्त केले तर सर्वांनाच अडचणीचं होणार आहे हे सांगितले पाहिजे. तशापध्दतीने पुढच्या गोष्टी व्हाव्यात जी महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली परंपरा, घडी आहे ती घडी विस्कटू न देता सत्ताधारी पक्षाचे लोक, मंत्रीमंडळातील लोक चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे असा सल्लाही दिला.

मुंबई आणि परिसरात गोवर रोगाची साथ जोरात आहे. राज्य सरकारचा आरोग्य विभाग काय उपाययोजना करतोय. तो यामध्ये कमी पडत आहे. त्यांनी घरोघरी जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत संपर्कात होते हेही आवर्जून सांगितले.

सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत की, आता महागाईवर बोलून उपयोग नाही. दहा वर्षांपूर्वी ४० हजाराचा मोबाईल हा ४ हजारात मिळतो याचा अर्थ महागाई कमी झाली आहे. असा दावा आहे किती हास्यास्पद दावा आहे हा… आजदेखील फोन कुठल्या कंपनीचा आहे तो लाखभर रुपये आहे. महागाईवर थातूरमातूर उत्तर देत आहेत असा जोरदार टोला अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना लगावला.

आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या सर्वच पक्षाच्या वरिष्ठांनी कारखानदारी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यांच्या काळात बाहेरचे मुख्यमंत्री, बाहेरून आलेले वरीष्ठ लोकं, इथे बसून महाराष्ट्र सोडून या राज्यात जा त्या राज्यात जा… अशापध्दतीने सांगत आहेत. हे राज्याला भूषणावह आहे का? मोठे प्रकल्प गेले ना? उदय सामंत यांचे स्टेटमेंट ऐकले की ३० दिवसात श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रातील उद्योग बाहेर का गेले हे सांगणार आहेत. जरुर सांगा.. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही आमच्या चुका असतील तर त्या समोर आल्या पाहिजेत तुमच्या पाच महिन्याच्या नाकर्तेपणामुळे ते प्रकल्प आपल्याकडे राहण्याकरता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते घेतले नसतील आणि म्हणून महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले असतील तर तेही सांगावे असे आव्हान उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिले.

महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले त्यातील महत्त्वाचे उद्योगपती म्हणतात यापेक्षा मोठे प्रकल्प आणू… आणा ना कधी आणणार आहात….कुणी अडवले… तरुणांची नोकरीची वये जायला लागली आहेत. ही वस्तुस्थिती सांगणे हे विरोधी पक्षनेते म्हणून माझे काम आहे असेही अजित पवार म्हणाले.

आनंदाचा शिधा आता जनतेला ‘मनस्तापाचा शिधा’ झाला आहे. अजून महाराष्ट्रातील लोकांना शिधा मिळालेला नाही. एका तर बहाद्दर मंत्र्यांने सांगितले की, तुलसीचे लग्न होईपर्यंत दिवाळी असते तोपर्यंत देऊ अजूनपर्यंत दिलेला नाही. ओला दुष्काळाकडे तर सरकारचे लक्षच नाही. हे महत्वाचे मुद्दे समोर आणत आहे. वेगवेगळी पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देत आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

या वाचाळवीरांना आवरा… त्यांना ताबडतोब सूचना द्या… महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *