Breaking News

नाट्य परिषदेच्या निवडणूकीत नियमभंग होतोय निर्माते राहुल भंडारे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शखेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये ‘आपलं पॅनल’च्या उमेदवारांनी मतदान केंद्राच्या म्हणजेच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिराच्या दालनातच बॅनर लावला आहे. यामुळे इलेक्शन काऊंन्सिल ऑफ इंडिया या कायद्यानुसार निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप नाट्य निर्माते राहुल भंडारे यांनी करत ‘आपलं पॅनल’मधील सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मागील काही वर्षांपासून नाट्य निर्माते म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या राहुल भंडारे यांच्यासह सुशील आंबेकर, गीता सोमण आणि गोविंद उर्फ हरी पाटणकर यांनी कोणत्याही पॅनल अंतर्गत निवडणूक न लढवता मुंबई मध्यवर्ती शाखेतून अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. भंडारे यांनी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी निवडणूक अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे निवडणूक प्रक्रियेत होत असणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाची तक्रारही केली.

मतदान केंद्राच्या आजूबाजूला बॅनरबाजी करणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेच्या नियमांना हरताळ फासण्यासारखे आहे. इलेक्शन काऊंन्सिल ऑफ इंडिया या कायद्यानुसार निवडणूक नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ‘आपलं पॅनल’मधील सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. याखेरीज राष्ट्रपतींसोबतचा फोटोही निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येत आहे. अशा विविध प्रकारांद्वारे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून याला आळा घातला तरच ही निवडणूक अधिक पारदर्शीपणे होईल असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव आणि गोट्या सावंत यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शविला. पॅनलमध्ये ठराविक व्यक्तींचीच मक्तेदारी असल्याने नवीन होतकरू उमेदवारांना नाट्य परिषदेची सेवा करण्याची संधी मिळत नाही. यासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचा खुलासाही या सर्व अपक्ष उमेदवारांनी केला. मतदान केंद्राबाहेरच्या बॅनरबाजीची दखल निवडणूक अधिकारी कशा प्रकारे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसात आणखी काही आश्चर्यजनक घडामोडी आणि आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. हे सर्व पाहता यंदाची नाट्य परिषदेची निवडणूक भलतीच रंगणार असल्याचं चित्र दिसतं.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *