Breaking News

अर्ज बाद होऊनही मोहन जोशी बनणार अध्यक्ष? निवडणूकीनंतरही रंगणार नाट्य परिषदेच्या कार्यकारीणीमधील नाट्य

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा नाट्य परिषदेच्या निवडणूकीतील अर्ज बाद झाल्याने तूर्तास जरी अध्यक्षपदाच्या दिशेने त्यांची वाटचाल खंडीत झाली, असली तरी निवडणूकीनंतर निवडणूक न लढवताही ते अध्यक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोरीवली शाखेच्या नटराज पॅनलला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मोहन जोशी यांनी स्वत:च तसे संकेत दिले.

नटराज पॅनलच्या वतीने नाट्य परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या मैथिली जावकर, विजय तारी, संजय देसाई, रवी पिळणकर आणि प्रभाकर (गोट्या) सावंत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मोहन जोशींनी अर्ज बाद झालेल्या प्रकारावर प्रकाश टाकत भविष्यात काय घडू शकतं याचेही संकेत दिले. जोशी म्हणाले की, निवडणूकीला उभं राहायचं नाही असं मी आणि दीपक करंजीकर अनेक दिवसांपासून सांगत होतो. हे मी माझा अर्ज बाद झाल्यामुळे बोलत नाही. तरुण विचारांचे लोक यावेत ही त्यामागील इच्छा होती. त्यानुसार मी निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं. त्यानंतर बऱ्याच जणांनी फोन करून निवडणूकीला उभे राहण्याची विनंतीही केली, पण मी माझा निर्णय बदलला नाही. निर्णय सांगण्यासाठी आम्ही नाट्य परिषदेच्या ट्रस्टींची मिटींग बोलवली. त्यात मी माझा निर्णय सांगितला, पण हाती घेतलेली कामं पूर्ण कोण करणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. उरलेल्या तीन दिवसांमध्ये सर्व कामं पूर्ण होणारी नसल्याने शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याची तयारी केली. त्यात चूक झाली आणि माझा अर्ज बाद झाला. १३ वर्षे अध्यक्षपदावर राहून काम पाहिलं. आता इच्छा नाही.

आपल्यानंतर सावरकरी विचारांचे, रोखठोक बोलणारे, बेधडक अभिनेते शरद पोंक्षे नाट्य परिषदेचे अध्यक्ष व्हावेत असं जोशींना वाटत होतं. त्यासाठी जोशींनी निवडणूक लढवण्याबात पोंक्षेंना विचारणा केली, परंतु त्यांनी नकार दिला. पोंक्षेनी दिलेला नकार आणि स्वत:चा बाद झालेला अर्ज, यामुळे सद्यपरिस्थितीत कोण अध्यक्ष होणं उचित आहे असा प्रश्न विचारला असता जोशींनी कोणा एका उमेदवाराचं नाव घेण्याचं टाळत निवडून आलेले सदस्य जो अध्यक्ष बनवतील तो मान्य असेल असं म्हणाले.

यंदाची निवडणूक ही नाट्य परिषदेच्या घटनेनुसार होत आहे. या घटनेनुसार एखादा उमेदवार निवडणूकीतून बाद झाला तरी निवडून आलेल्या सदस्यांच्या निवड प्रक्रियेद्वारे दोन महिन्यांनी नाट्य परिषदेचा अध्यक्ष बदलला जाऊ शकतो. या मुद्द्यानुसार जर तुम्हाला पुन्हा संधी मिळाली तर अध्यक्ष होणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना जोशी म्हणाले की, घटनेतील या तरतूदीबाबत मला जास्त ठाऊक नाही. खरं तर माझी इच्छा नाही, पण निवडून आलेल्या सदस्यांचीच जर तशी इच्छा असेल तर नाट्य परिषदेची सेवा करण्यासाठी मी नेहमीच तयार असेन. हा सर्व जर-तरचा खेळ असेल. वेळ येईल तेव्हा योग्य निर्णय घेतला जाईल.

नटराज पॅनलच्यावतीने या निवडणूकीसाठी कोणत्याही प्रकारचा वचननामा प्रकाशित केलेला नाही. आम्ही खऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून त्यांनी केलेलं कार्यच त्यांया गळ्यात विजयाची माळ घालण्यास कारणीभूत ठरणार असल्याचं मत प्रदीप कबरे यांनी व्यक्त केलं. नटराज पॅनलच्या उमेदवारांनीही नाट्यसृष्टीशी निगडीत असलेली सर्व कामं हिरीरीने करणार असल्याचं सांगितलं.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *