Breaking News

शरद पवार म्हणाले, जेथे सत्ता नाही तेथे सत्तेपासून दूर करणे हाच उपक्रम… केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावरून साधला निशाणा

देशातील विविध राज्यांमधील राजकिय नेत्यांच्या विरोधात सध्या कधी सीबीआयकडून तर कधी ईडीकडून तर कधी आयकर विभागाकडून धाडी टाकण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, राजकीय नेतृत्वाने सतत काहीना काही कारणातून कुणावर खटले कसे करता येतील, कुणाच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावता येईल हे प्रकार सतत चालू आहेत. हे आपल्याच राज्यात सुरु आहेत असं नाही गुजरातमध्ये या तक्रारी आहेत. झारखंडमध्येही तक्रारी आहेत. यामध्ये दोन प्रकार आहेत. याठिकाणी केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्या हातामध्ये राज्याची सत्ता नाही अशा ठिकाणी असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करायचं हा एक उपक्रम भाजपाने अनेक राज्यात म्हणजे ज्याठिकाणी भाजपची सत्ता नाही त्याठिकाणी घेतला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या दौरा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.या पत्रकार परिषदेला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

कर्नाटकमध्ये आज भाजपाचं सरकार आहे परंतु कर्नाटकमध्ये भाजपाचं सरकार नव्हतं त्या सरकारमधील काही लोक फोडले. त्यानंतर त्यांच्या मदतीने सरकार बनवले. महाराष्ट्रात शिवसेनेचा एक वर्ग बाजुला केला गेला आणि उध्दव ठाकरे यांचे सरकार घालवले गेले. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या सरकारमधील काही लोक फोडले गेले त्यांच्या मदतीने आज भाजपाचं सरकार आणलं गेलं. हे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. सत्ता लोकांनी दिली नाही तर लोकांनी दिलेल्या सदस्यांना फोडून आमिषे दाखवून त्यांना बाजूला करुन ती सत्ता हातामध्ये घ्यायची हे सुत्र भाजपाने केलेले आहे असाही आरोप शरद पवार यांनी केला.

देशामध्ये राज्यातील राज्य सरकारे त्यांना पुन्हा संधी देईल याचा विश्वास त्यांना नाहीय आणि संधी आहे की नाही याचे चित्र संबंध देशाने पाहिले. केरळमध्ये काय आहे भाजपाचं सरकार नाही. तामिळनाडूमध्ये भाजपा नाही. कर्नाटकात भाजपाचं सरकार नव्हतं, आंध्रप्रदेशमध्ये भाजपाचं सरकार नाही. तेलंगणामध्ये भाजपाचं सरकार नाही. महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नव्हतं. गुजरात, मध्यप्रदेश सोडलं तर भाजपाचं सरकार नव्हतं. ओरिसामध्ये भाजपा सरकार नाही. झारखंड, पश्चिम बंगालमध्ये नाहीय. संबंध देशाचं बघितलं तर मोजकी राज्य गुजरात, आसाम अशी मोजकी तीन-चार राज्य सोडली तर भाजपाकडे सत्ता नव्हती, लोकांनी दिलेली नाही. याचा अर्थ लोकांचं मत त्या पक्षाच्यासंबंधित दिवसेंदिवस बदलत आहे याची ही प्रचिती आहे आणि म्हणून या मार्गाने सत्ता येत नसेल तर माणसं फोडणं, साधनांचा वापर करणं, ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करणं आणि सत्ता काबीज करणं हे गंभीर चित्र आज देशाच्यासमोर दिसत आहे. याप्रकारचे आव्हान आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आम्ही प्रयत्न करतोय की, देशातील नॉनबिजेपी राजकीय पक्ष आहेत त्यांचाशी सुसंवाद साधून याप्रकारे लोकशाहीच्या मार्गाने आलेली सरकारे ही उध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्याच्याविरोधात एक प्रकारे जनमत तयार करता आले तर ते करावं. याबाबत अशी चर्चा करणार आहोत. यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे कारण संसदीय लोकशाहीवरच हा हल्ला केला जात आहे अशी गंभीर भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

दुसऱ्या बाजूने राजकीय नेत्यांना या ना त्या कारणाने त्रास देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात त्याची उदाहरणे आहेत. राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर तर ११० धाडी टाकण्यात आल्या. याचा उच्चांक या देशात कधीही घडला नव्हता तो झाला. याचा अर्थ यंत्रणांचा वापर केला जात आहे. हीच गोष्ट नवाब मलिक यांच्याबाबतीत, संजय राऊत यांच्याबाबतीत करण्यात आली. यंत्रणांचा वापर होतोय हे चित्र यापूर्वी कधी दिसले नाही ते दिसत आहे हे चिंताजनक आहे असेही शरद पवार म्हणाले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *