Breaking News

मंत्रालयातील उंदीर मारण्याचे विष पिऊन धर्मा पाटील यांची आत्महत्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयात एका आठवड्यात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचे सांगत सभागृहात एकच हलकल्लोळ उडवून देत जिथे महापालिकेला सहा लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात तिथे सात दिवसांत या संस्थेने हा पराक्रम कसा साधला असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ ख़डसे यांनी विधानसभेत करीत हे उंदीर मारण्याचे विष धर्मा पाटलांच्या हाती लागल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोट करत सभागृहात एकच खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या सामान्य प्रशासन विभागातील हा मोठा गैरव्यवहार असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या चर्चे दरम्यान बोलताना एकनाथ खडसे यांनी हा आरोप केला. विशेष म्हणजे मंत्रीपदावरून पाय उतार झाल्यापासून राज्य सरकारला अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याची एकही संधी खडसे सोडत नाहीत.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, एका संस्थेला मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम २०१६ साली देण्यात आले. या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचे आढळले. गलेलठ्ठ उंदीर, किरकोळ उंदीर, पांढरे, काळे उंदीर अशी वर्गवारीच या संस्थेने केली. महत्त्वाचे म्हणजे सहा महिन्यांचे हे काम संस्थेने सात दिवसांतच पूर्ण केल्याचे दाखवले आहे. या संस्थेने प्रत्येक दिवसाला ४५ हजार ६२८.५७ उंदीर मारल्याचे म्हटले आहे. यातील .५७ म्हणजे नवीन जन्मलेले उंदीर असावेत. मिनिटाला ३१.६८ उंदीर मारले. दररोज मारलेल्या या उंदरांचे वजन ९,१२५.७१ किलो म्हणजे ९ टन होते. दररोज एक टन उंदीर ट्रकमधून घेऊन गेले. पण त्यांचे दफन किंवा विल्हेवाट कुठे लावली याचा कोणताही अहवाल सरकारकडे उपलब्ध नसल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.

याच दरम्यान मंत्रालयात आलेले धर्मा पाटील यांच्या हाती हे विष लागले आणि त्यांनी आत्महत्या केली, असे खडसे यांनी सांगताच सभागृह अवाक झाले. हे विष बाळगण्यासाठी लागणारी परवानगी या संस्थेने सामान्य प्रशासन किंवा गृह विभागाकडून घेतलेली नाही. तसेच वीष हाताळण्याचा परवानाही या संस्थेकडे नव्हता, असे सांगत या संस्थेने महापालिकेला दोन वर्षांत न साधता आलेले दिव्य सात दिवसांत कसे साधले असा सवाल केला. एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात १० मांजरी सोडल्या असत्या तरी झाले असते, अशी कोपरखळी त्यांनी मारली.

एकट्या मंत्रालयात जर तीन लाख १९ हजार ४०० उंदीर असतील तर राज्य सरकारच्या राज्यभरातील सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि महामंडळांत किती उंदीर असतील असा सवाल उपस्थित करत या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण गंभीर असून अशा प्रकरणांमुळे सरकार बदनाम झाले असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *