Breaking News

मराठा समाजातील ७३९ तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतेय? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी मराठा समाजातील ७३९ तरुणांची (एसईबीसी) लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पुर्ण झाली असताना त्यांना शासन सेवेत का नियुक्ती दिली जात नाही. या तरुणांवर शासन अन्याय करते आहे, त्यांना तातडीने न्याय द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले १२ दिवस उपोषण करीत असून आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी भेट घेतली. व त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला. या तरुणांचे म्हणणे ऐकल्यावर तसेच त्यांचे निवेदन स्विकारल्या नंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनीवरून संपर्क करुन या तरुणांच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी लोकसेवा आयोगाने परिक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या या ७३९ उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करुन प्रक्रिया पुर्ण केली होती, तर मग त्यांना नियुक्ती का दिली जात नाही?. याच काळात छाननी झालेल्या काही उमेदवारांना अन्य खात्यात नियुक्ती दिल्या गेल्याचे समजते, मग या ७३९ तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करते आहे? अन्य समाजाला जसा शासनाने न्याय दिला तसाच न्याय मराठा समाजातील तरुणांना मिळावा. कुणावरही अन्याय होणार नाही अशी समान न्यायाची भूमिका शासनाने घ्यावी अशी मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली.

दरम्यान, या तरुणांचे निवेदन स्विकारुन त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा करु अशी ग्वाही आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

 

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *