Breaking News

नाना पटोले म्हणाले, १० मार्चनंतर सरकार आणि पक्षाच्या कामकाजात बदल महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत

मराठी ई-बातम्या टीम

केंद्रातील भाजपचे सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते महाविकास आघाडी सरकार पाडू शकत नाहीत. आघाडीतील तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत, एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

आज टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, विधानसभा व विधानपरिषद सदस्य तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत डिजीटल सदस्य नोंदणी अभियान राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. याबैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुर्नविकास मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. बाळू धानोरकर, खा. कुमार केतकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची स्थापना मोठ्या संघर्षाने झाली आहे. भाजपा नेत्यांनी दररोज नवनव्या तारखा दिल्या, मुहुर्त काढले पण सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना सरकार पाडता आले नाही. आता पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून तोच प्रयत्न पुन्हा सुरु असल्याचे संजय राऊत यांनी उघड केले आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असून भाजपाने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि तिन्ही पक्ष एकत्रितपणे भाजपाच्या दडपशाहीचा मुकाबला करतील. राज्यातील जनता सर्व उघड्या डोळ्यांनी पहात असून ते भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही दिला.

गेल्या वेळच्या अधिवेशनासारखी यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणती अडचण येईल असं वाटत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडूक पार पडेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर पक्षश्रेष्ठी उमेदवारही जाहीर करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होऊ लागले असून आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कोरोनामुळे सरकार आणि पक्षाच्या कामावर अनेक बंधने नियंत्रणे आली होती. पण आता रूग्णसंख्या कमी होत असल्याने १० मार्चनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता दरबार होणार आहेत. काँग्रेस पक्षाचे मंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत. तसेच मुंबईतील प्रदेश कार्यालयातही मंत्र्यांच्या जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहेत. सरकार आणि पक्षाच्या कामकाजात १० मार्चनंतर बदल करून ते अधिक लोकाभिमुख करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात व्हावे अशी आमची इच्छा आहे पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच आजारातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशन होतेय. ते अधिवेशनापर्यंत ठणठणीत बरे झाले तर ठिकाण बदलता येईल. अधिवेशन कुठे होते यापेक्षा विदर्भाचे प्रश्न सुटतात की नाही हे महत्त्वाचे आहे. अधिवेशन मुंबईत झाले तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेच्या हिताचे तिथल्या विकासाला चालना देणारे निर्णय महाविकास आघाडी सरकार घेईल. मराठवाडा, विदर्भातील औद्योगिक वापराची विद्युत बिलाची सब्सीडी सुरु ठेवण्यात यावी तसेच कृषी पंपासाठी दररोज १२ तास सुरळित वीजपुरवठा करण्यात यावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री असताना विदर्भाचा विकास झाला नाही, विधानभवन पाण्यात बुडाले होते. त्यांनी विदर्भाच्या विकासाची काळजी करू नये महाविकास आघाडी विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *