Breaking News

जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन !: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी उद्या शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असताना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही अजून झालेली नाही. जेईई परिक्षेसाठी तब्बल साडेआठ लाख विद्यार्थी बसलेले आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने  विद्यार्थी परिक्षा देण्यास एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे बिहार, आसाम मध्ये गंभीर पुरस्थिती आहे, अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडून त्यांच्यावर मानसिक दडपण आणण्याचा हा प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या कालच्या बैठकीतही या परीक्षा घेण्यास विरोध करण्यात आला असून केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खा. राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्य व भविष्याची चिंता व्यक्त करत या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. एसएसयुआयनेही केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिलेला आहे. प्रदेश काँग्रेसही केंद्र सरकारच्या या मनमानी व हटवादी भुमिकेच्या विरोधात शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्व जिल्ह्यात केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगत मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *