Breaking News

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही भाजपाशी आतून बोलणी सुरु, किती दिवस सोबत राहतील माहिती नाही

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीची भाजपासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहिती नाही. तसेच राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने घ्यायची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

अलिकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबद्दल वेगवेगळे दावे केले जात होते. अजित पवार लवकरच काही आमदारांना घेऊन भाजपाशी हातमिळवणी करतील, अशा शक्यता शिंदे गटाचे आमदार सातत्याने व्यक्त करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या आघाडीतला सहकारी असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जेडीएसला रसद पुरवण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. हे (राष्ट्रवादी) अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, रोज बातम्या येतात, कोणता नेता जाणार आणि कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांचं ते बघतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळेल यासाठी मतांची टक्केवारी वाढवण्याकरता ते निवडणूक लढतायत. परंतु भाजपाची टक्केवारी वेगळी आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *