Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उत्तराधिकारी नेमणे ही माझ्या ठरवलेल्या…. ज्यांना जायचं त्यांनी जावं, पण अशी वेळ येते तेव्हा नेतृत्वानं नरमाईचे धोरण घ्यायचं नसतं हे मला कळतं

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानकपणे जाहिर केलेला निवृत्तीचा निर्णय आणि त्यानंतर अजित पवार यांच्याबद्दल निर्माण झालेली संशयाची सुई आणि पक्षाचे कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका या सगळ्या आग्रहामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनाम्यासंदर्भात भूमिका मांडताना पक्षांतर्गत चुळबुळ करणाऱ्या नेत्यांबरोबरच पक्षाचा उत्तराधिकारी कोण असावा याबद्दल शरद पवार यांनी भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी शरद पवार यांना विचारले की, अनेक आमदार असलेल्या एका मोठ्या नेत्याबरोबर दुसऱ्या पक्षात जाणार होते म्हणून राजीनामा दिला का? असा थेट प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, कोणताही पक्ष असू द्या, जर कुणाला पक्ष सोडून जायचं असेल, तर त्यांना कुणीही अडवत नाही. त्यासाठी पक्षाच्या नेत्याने स्वतः नरमाईची भूमिका घेण्याची गरज नाही. अशावेळी नेत्याने पुढे येऊन या परिस्थितीत बदल कसा घडू शकतो यावर लक्ष दिलं पाहिजे. इतकं तर मला कळतं. मात्र, अशी स्थिती आमच्या पक्षात नाही असे स्पष्ट केले. तसेच याचा माझ्या बोलण्याचा संबध येथे गैरहजर राहिल्यांशी जोडू नका असे सांगत अजित पवार यांचा उल्लेख न करता स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये भाजपाबरोबर जाण्याचा कल आहे का? निवृत्तीनंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं असा विचार आहे का? असे दोन प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. एक गोष्ट त्यातील काही अंशी खरी आहे की, मी राजीनामा मागे घेण्याबाबत ऐकणार नाही असं लक्षात घेऊन काही सहकाऱ्यांनी मी अध्यक्ष म्हणून काम करावं आणि एका कार्याध्यक्षाच्या पदाची निर्मिती करण्याचा विचार करा, असं सुचवलं होतं. मात्र, ही सूचना सहकाऱ्यांना आणि सुप्रिया सुळे दोघांनाही मान्य नव्हती असे सांगत सुप्रिया सुळे या पक्षाच्या उत्तराधिकारी होतील अशी अप्रत्यक्ष कबुली दिली.

शरद पवार म्हणाले, उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी दिली पाहिजे. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन. काही लोक १०-१५ वर्षे जिल्हास्तरावर काम करतात आणि ते राज्यपातळीवरही काम करू शकतात ही क्षमता त्यांच्यात आहे हे आम्हाला माहिती आहे. तसेच राज्यस्तरावर अनेक वर्षे काम करणारे लोक आहेत जे राष्ट्रीय पातळीवरही काम करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आहे. आम्ही ही जबाबदारी हळूहळू पार पाडणार आहोत, असंही स्पष्ट केले.

यावेळी अन्य एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने शरद पवारांना प्रश्न केला की, तुम्ही गेल्या ६३ वर्षांपासून समाजकारणात आहात. तर ५६ वर्षांपासून तुम्ही मुख्य राजकारणात सक्रीय आहात. त्याचबरोबर २४ वर्षांहून अधिक काळ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहात. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही तुमच्यासाठी एक उत्तराधिकारी तयार करू शकला नाहीत, स्वतःचा बॅकअप तयार करू शकला नाहीत, याकडे कसं पाहता? यावर शरद पवार म्हणाले. इथे माझ्याजवळ बसलेले सर्वजण हा माझा बॅकअपच आहे. यावेळी पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मोठमोठे नेते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ही सर्व मंडळी माझा बॅकअप आहेत. हे लोक राज्य चालवू शकतात, इतकंच काय देशही चालवू शकतात. यांना संधी मिळावी म्हणून तर मी मागे जाणार होतो. पण यांनी एकलं नाही, मी यावर काय करू? तसेच शरद पवार त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबबातही बोलले. ते म्हणाले, उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी द्यायला हवी. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन.

तसेच भाकरी फिरविण्याच्या वक्तव्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, भाकरी फिरवणारच होतो पण आता ती थांबली अशी मिश्किल टीपण्णी केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *