Breaking News

देवेंद्र फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल, उद्योजक म्हणाले राज्यात औद्योगिक वातावरण नाही

मागील काही दिवसांपासून राज्यातून उद्योग जाण्यावरून एकप्रकारच्या खोट्या कथा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी उध्दव ठाकरे गट आणि एचएमव्ही पत्रकारांकडून अर्थात हिज मास्टर्स व्हॉइस (अर्थात त्यांच्या मालकांच्या इशाऱ्यावरून) हे काम सुरु आहे. जे उद्योग राज्यातून गेले ते आमच्या सरकारच्या काळात गेले नसून ते सर्व उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात गेले असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
गेल्या तीन-चार दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस आणि सॅफ्रन या तीन कंपन्या महाराष्ट्रातून गेल्या. यापैकी टाटा एअरबस ही कंपनी गुजरातला तर सॅफ्रन ही कंपनी हैद्राबादला गेली. यावरून उध्दव ठाकरे गटाकडून माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. तसेच गेलेले प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातच गेल्याचा आरोप केला. त्या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नसल्याचे वक्तव्य त्यावेळी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीच केले होते असा दावाही त्यांनी यावेळी केला.

राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी राज्यातून जाण्यामागे महाविकास आघाडी सरकारने त्यांना द्यावयाच्या सवलतींबाबत निर्णय घेतला नाही. त्यावेळी मी स्वतः अनिल कुमार यांच्याशी बोललो. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, जे काही गुजरात देतंय त्यापेक्षा आम्ही जास्त देऊ. पण महाविकास आघाडीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला नाही. त्यामुळे ही कंपनी गुजरातला गेल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा एअरबस प्रकल्पाबाबतही माझी स्वतः रतन टाटा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. त्या सर्वांना मी नागपूरला नेऊन मिहानमधील जागाही दाखविली. त्यावेळीही महाविकास आघाडीकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे पत्र पाठविले नाही की, त्यांच्याशी संपर्क केला नाही. त्यामुळे एक वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि ते राज्यातून निघून गेले. त्यावेळी मी चर्चा करताना त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी मी चर्चा करताना सांगितले की, महाराष्ट्रात उद्योग सौहार्दाचे वातावरण नाही. त्यामुळे आम्ही इथे गुंतवणूक करणार नाही. त्यावर मी त्यांना सांगितले होते की, मी हवं तर उध्दव ठाकरे यांच्याकडे जातो. पण तुम्ही महाराष्ट्रातून उद्योग नेऊ नका. त्यानंतरही राज्य सरकारने एअरबस प्रकल्पासाठी जमिन दिली नाही की संपर्क केला नाही. त्यामुळे एअरबसचा प्रकल्पही गेला. मात्र हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या बातम्या त्यावेळी अनेक दैनिकांमध्ये छापून आलेल्या आहेत असे सांगत त्याविषयीची कात्रणेही त्यांनी यावेळी दाखविली.
हे दोन्ही प्रकल्प राज्यातून जात असताना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच होते आणि त्यांच्या कार्यकाळातच गेल्याचा दावाही त्यांनी केला.

सॅफ्रन प्रकल्पाबाबतही त्यावेळी महाविकास आघाडीने कोणताही संपर्क आणि पत्र व्यवहार केला नसल्याने ही कंपनी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे हे तिन्ही प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच गेले. मात्र ते आमच्या काळात गेल्याचा दावा करण्यात येत आहे. हे अशा पध्दतीचे फेक नॅरेटीव्ह अर्थात कपोलकल्पित, खोटे कुंभाड, खोट्या कथा रचण्याचे काम एचएमव्ही अर्थात हिज मास्टर्स व्हाइस असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून सध्या सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *