Breaking News

तीन उद्योगाच्या बदल्यात एक उद्योग राज्याला मंजूर, पण अर्थसंकल्पात जाहिर होणार

राज्यातून दिड लाख कोटी गुंतवणूकीचा वेदांता-फॉक्सकॉन आणि २१ हजार कोटींचा टाटा-एअर बस उद्योग गुजरातला गेला. त्यापाठोपाठ सॅफ्रन हा उद्योगही राज्यातून हैद्राबादला गेला. हे तीन मोठे उद्योग राज्यातून गेल्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर अंतर्गत २ हजार कोटी रूपयांचा उद्योग मंजूर करण्यात आलेला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मात्र या उद्योगाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेली नसली तर आगामी केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसापासून राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप करत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारची बाजू मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत त्यांनी वरील माहिती दिली.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारले जाणार असून त्या माध्यमातून सुमारे २००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त होणार आहे. हे क्लस्टर तयार करण्याची जबाबदारी प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून एमआयडीसी असणार आहे. २९७.११ एकर जागेवर हे क्लस्टर साकारणार असून, त्यासाठी पायाभूत सुविधांवर ४९२.८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यातील २०७.९८ कोटी रुपये हे केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून २००० कोटींची गुंतवणूक येणार असून, सुमारे ५००० वर रोजगार निर्माण होणार आहेत. माहिती-तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज नवी दिल्ली येथे ही घोषणा केली. मे. आयएफबी रेफ्रिजीरशन लि. यांनी ४५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या लक्ष्यासह बांधकामसुद्धा सुरू केले आहे. आगामी ३२ महिन्यात हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारणार आहे. यात इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक आणि घटक इत्यादी उद्योग मोठ्या प्रमाणात येणार आहेत.

हा प्रकल्प जरी फार मोठा नसला तरी या प्रकल्पातून एक औद्योगिक वातावरण निर्मिती होणार आहे. तसेच या उद्योगातून प्रत्यक्ष ५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तर अप्रत्यक्षरित्या १० पेक्षा अधिक वेळा निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

बोर्नव्हिटासह सर्व पेये आणि खाद्य पेये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून काढून टाका

देशात एकाबाजूला आगामी लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी वाजत असताना दुसऱ्या बाजूला मात्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *