Breaking News

अखेर महागाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर बोलले, गॅस दरात १०० रू. कपात

मागील ९ वर्षापासून आणि विशेषतः कोरोना काळापासून इंधन आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य ते मध्यम वर्गातील कुटुंबियांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र तरीही काटकसरीची परिसिमा गाठत सर्वसामान्य नागरिक आणि महिला वर्गाकडून आपल्या प्रपंचाचा गाडा ओढला जात आहे. या सगळ्या घडामोडींवर मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत गॅस ५०० रूपयांपर्यंत देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अगदी त्याच धर्तीवर लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता कधीही जाहिर होऊ शकते या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनाचे औचित्य साधत घरगुती गॅसच्या किंमतीत १०० रूपये कपात करण्याचा निर्णय एक्स या मायक्रो ब्लॉगिंक साईटवर आज शुक्रवारी जाहिर केला.

घरगुती गॅसच्या किंमती ११०० पार गेल्या होत्या. त्यामुळे उज्वला योजनेतील सर्वसामान्य महिलांनी गॅस खरेदी करणे सोडून दिले होते. परंतु साधारणतः सहा महिन्यापूर्वी हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि नागालॅड राज्यातील पाच राज्याच्या निवडणूकीच्या कालावधीत भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी ५०० रूपयांपर्यंत गॅस देण्याची तयारी दाखविली. त्यामुळे ११०० रूपयांच्या वर असलेल्या गॅसच्या किंमती ९०० ते ९५० रूपयांच्या जवळपास आल्या. तर अर्थसंकल्पिय अधिवेशनात उज्वला योजनेखाली गॅस वापरणाऱ्या कुटुंबियांना मिळाणाऱ्या सबसिडीच्या रकमेतही वाढ करण्यात आली. या घोषणांचा राजकिय फायदा भाजपाला चांगला मिळाला. अगदी त्याच धर्तीवर लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर देशातील ४०० पार जागा मिळविण्यासाठी आणि मोदी गँरटीच्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी देशातील गॅसच्या दरात आज महिला दिनाचे औचित्य साधत कपात करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केला.

गॅस किमतीत कऱण्यात आलेल्या १०० रू. कपातीमुळे दिल्लीत ९०३ रूपयांना मिळणारा गॅस आता ८०३ रूपयांना उपलब्ध होणार आहे. मुंबईत ९०२.५ रूपयांना मिळणारा गॅस ८०२.५ रूपयांना मिळणार आहे. कोलकाता येथे ९२९ रूपयांना मिळणारा गॅस ८२९ रूपयांना उपलब्ध होणार आहे. चेन्नई येथील ९१८.५ मिळणारा गॅस आता ८१८.५ रूपयांना मिळणार आहे.

मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या गॅस किंमतीच्या सबसिडीत आणखी २०० रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहिर केला होता. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल रात्री झालेल्या बैठकीत आणखी १०० रूपये कपात गॅस किंमतीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कपामुळे चालू आर्थिक वर्षाच्या सरकारी तिजोरीत १२ हजार कोटींची तूट निर्माण होणार असली तरी त्याचा फायदा देशातील १० कोटी कुटुंबियांना होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नारी शक्तीला वदंन केले. तसेच महिला वर्गाच्या विविध क्षेत्रातील योगदानाच्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून नवे उद्योजिका धोरण, शेती-उद्योग, तंत्रज्ञान आदी क्षेत्रासह अन्य क्षेत्रात महिलांना पुढे आणण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे एक्स सोशल मायक्रो ब्लॉगिंगच्या साईटवर सांगितले.

 

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *