Breaking News

फडणवीसांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी खडसे, तावडे, बावनकुळे, महेतांची गच्छंती ? भाजपातही निष्ठावंतांच्या नशीबी सतरंज्याच

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रेची घोषणा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीच परत येणार असल्याची जाहीरात सुरु केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदी राहणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांचा पुढील कार्यकाळ निर्धोक रहावा यासाठी अडचणीचे ठरणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश महेतांची उमेदवारी कापण्यात आल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
एकनाथ खडसे हे पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्यांनी यापूर्वी विरोधी पक्षनेते, मंत्री पद भूषविलेले आहे. मात्र राज्यात सत्ता स्थानापन्न झाल्यानंतर खडसेंच्या कार्यशैलीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्व पक्षात आणि राज्य मंत्रिमंडळात कमी झाल्याचे दिसत होते. नेमक्या याच कालावधीत खडसे यांच्याकडील एका व्यक्तीने कल्याण येथील जमिनप्रकरणी २ कोटी रूपयांची लाच मागितल्याचे प्रकरण उघडकीस आणण्यात आले. त्यापाठोपाठ त्यांचे दाऊदबरोबरील संभाषणप्रकरण, पुणे येथील एमआयडीसी जमिन घोटाळाप्रकरण आदी उघडकीस आणण्यात आले. त्यामुळे अखेर खडसे यांना आपल्या मंत्रिमंपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतरही पक्षातून त्यांचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सांसदीय कार्यमंत्री विनोद तावडे हे देखील मुख्यमत्री फडणवीसांचे विरोधक म्हणून पक्षात परिचित आहेत. मात्र त्यांच्याकडून फडणवीसांच्या विरोधात सुप्त हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे.
माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी तर एमपी मिल कंपाऊडप्रकरणी पडद्यामागे चालत असलेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्यवहाराचाच पर्दाफाश केला. त्यामुळे काही काळ भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराबाबतच राज्यातील जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तसेच विरोधकांनीही सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली.
चंद्रशेखर बावनकुळे हे वास्तविक पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. मात्र आपल्या गतीमान कारभारामुळे त्यांनी राज्यात स्वतंत्र स्थान निर्माण केले. तसेच सातत्याने प्रसारमाध्यमात राहण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रिमंडळात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती गडकरी यांना पोहोचविण्यात येत असल्याचा त्यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला.
याच मंडळीकडून आगामी पाच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणी निर्माण करण्याची शक्यता गृहीत धरून या सर्वांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तसेच या मंडळीकडून पक्षांतर्गत असलेली बंडाळीही बाहेर येवू शकते अशी शक्यता गृहीत धरून या सर्वांना सर्वचस्तरातून बाहेर ठेवण्याचे प्रयत्न पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या ज्येष्ठ मंडळींना डावलतानाच स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले परिणय फुके यांना विधान परिषदेवर देवून मंत्री पद दिले. तर अभिमन्यु पवार यांना औसा येथून आणि विद्याधर महाले यांच्या पत्नी विमला महाले यांना चिखलीतून विद्यमान आमदारांना डावलत उमेदवारी देत स्वतःच्या खास मर्जीतील व्यक्तींना उमेदवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वास्तविक पाहता यातील कोणाचच पक्षाशी संबध नसताना यांना केवळ स्वीय सहाय्यक असल्याच्या कारणावर उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे निष्ठावंतांच्या नशीबी फक्त सतरंज्याच येणार का? असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *