Breaking News

पवार म्हणतात संपर्कात खडसे- पवारांच्या संपर्कात नाही अखेर खडसेंना तिकिट नाहीच

ठाणे-जळगांवः प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जन्म बारामतीचा असून मागील तीन महिन्यापासून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील सभेत केला. त्यामुळे नाराज खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण कोणत्याच पवारांच्या संपर्कात नसल्याचे सांगत यावर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.
जनतेच्या समस्यांची उत्तरं नसल्यानं सत्ताधाऱ्यांकडून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपा-शिवसेनेवर केली.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांनी नाराज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, तीन महिनेच काय तीन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मात्र आपण कोणत्याही पवारांशी संपर्कात नसल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीचं तिकिट देणार नाही असं मला पक्षानं सांगितलं. काहीही हरकत नाही माझ्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एकनाथ खडसे आहे असं एकनाथ खडसेंनी सांगितले. आपण भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस इथे आहात हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण पक्षाला बळकटी आणण्याचं काम केलं आहे. पक्षाचा निर्णय मान्य आहे असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यांनी अपक्ष लढावं अशी घोषणाही कार्यकर्ते करत होते. तसंच या पत्रकार परिषदेच्या वेळी एकच भाऊ, नाथाभाऊ अशा घोषणाही देण्यात आल्या. एकनाथ खडसे हे अपक्ष लढतील अशीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. मात्र अशी कोणतीही घोषणा त्यांनी केली नाही. आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. पक्ष जो निर्णय घेईल तो आपण मान्य केला पाहिजे असंही खडसे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तसेच सगळ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *