Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात वेगळंच वातावरण…पटत नाही… रायगड येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

मागील दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, आमदारांच्या आणि नुकतेच महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या घरावर छापे मारण्यात येत आहेत. तसेच या छापेममारीवरून रोज सत्ताधारी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात राज्यातील वातावरण बदलल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यात वेगळंच वातावरण झाल्याचे दिसून येत आहे. पण मला स्वत:ला ते पटत नाही अशी नाराजी व्यक्त करत आपला सुसंस्कृतपणा जपला पाहिजे असे आवाहन राज्यातील राजकीय नेत्यांना केले.

नुकतेच ईडीनं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केलेली अटक आणि त्यापाठोपाठ मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागानं केलेली छापेमारी यावरून आरोप-प्रत्यारोपांचा नवा अंक राज्यात सध्या दिसत आहे.

रायगडमधील रोह्यामध्ये आज चिंतामणराव देशमुख सभागृहाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजन सोहळ्यावेळी अजित पवारांनी केलेल्या भाषणात राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले.

सध्या एकमेकांचे वाभाडे काढण्याचं, एकमेकांविषयी हीन वक्तव्य करण्याचे काम सुरू आहे. एकाने एक विधान केलं की दुसऱ्यानं दुसरं करायचे. त्यातून नवीन पिढीला वाटतं की हे राजकारणी काय बोलतायत. कोणत्या पद्धतीने कुणाला छळलं जात आहे? असलेल्या सत्तेचा वापर कसा केला जातोय? हे सगळं आज उभा महाराष्ट्र बघतोय. पण ही महाराष्ट्राची परंपरा नसल्याचे सांगत प्रत्येकानं आपल्या अशा बोलण्याला कुठेतरी आवर घातला पाहिजे. कुठेतरी थांबलं पाहिजे. वैचारिक मतभेद असू शकतात. आपापल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना राज्यघटनेने दिला आहे. पण त्यातून आपण चुकीचे काही वागता कामा नये असे आवाहनही त्यांनी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांना केले.

आई-वडील कष्टाने मुला-मुलींना शिकवतात. त्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या गावी पाठवतात. पण मुलं तिकडे गेली का तिकडेच लग्न करतात आणि तिकडेच सेटल होतात. परत यायचं नावचं घेत नाहीत. सर्वच पिढी असे करत नाही. काही पिढी असे करते. मात्र आम्हाला मुंबईत जास्त वेळ राहिलो तर परत बारामतील कधी जातो असे होते. पण काही बंडलबाज पोरंपण जन्माला येतात. एका वयस्कर वडिलांना मुलाने विमानतळावर सोडले आणि बाहेरगावी निघून गेला हे बरोबर नाही असे सांगत माणुसकी विसरू नका. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचेही असतात हे कायम लक्षात ठेवा अशा कानपिचक्याही त्यांनी तरूण पिढीला दिल्या.

Check Also

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *