Breaking News

काम करणारा नेता गेला काँग्रेस नेते डॉ.पतंगराव कदम यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी

सांगलीसह राज्याच्या राजकारणात आपल्या हजरजबाबी बोलण्याने मिश्किली निर्माण करणारे आणि जनतेची कामे करणारा नेता म्हणून ओळख असलेले सांगली जिल्ह्यातील आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सुरुवातीला ब्रीच कँण्डी रूग्णालयात आणि त्यानंतर लीलावती रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाल्याचे त्यांच्याजवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत आहेत. पतंगराव कदम यांच्या जाण्याने काम करणारा नेता गेल्याची भावना पश्चिम महाराष्ट्रातील नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म इ.स. १९४५ साली सांगली जिल्ह्यातील सोनसळ येथे झाला. स्व. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तब्बल चार वेळा विधानसभेवर निवडून येत राज्य मंत्रिमंडळात महसूल मंत्री, उद्योग मंत्री आणि त्यानंतर मदत व पुर्नवसन मंत्री म्हणून काम पाहिले. तसेच ते एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणूनही ओळखले जात होते.

डॉ. पतंगराव कदम हे ब्लड कँन्सर आजाराने ग्रस्त झाले होते. त्यांच्यावर परदेशातील जर्मनी येथे उपचार करण्यात येते होते. साधारणत: तीन महिन्यापूर्वी जर्मनीत जावून त्यांनी उपचार करून घेतले होते. मात्र परत भारतात आल्यावर पुन्हा त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीला त्यांना ब्रीच कँण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेच्या संपूर्ण भारतासह विदेशात १८० संस्था आहेत. या संस्थांमध्ये कोणताही गरीब विद्यार्थी प्रवेशासाठी गेला असता त्या विद्यार्थ्याला लगेच प्रवेश मिळतो. त्याशिवाय त्या विद्यार्थ्याची कोणतीही शैक्षणिक फी भारती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून आकारली जात नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील अनेक विद्यार्थी त्यांना प्रवेशासाठी भेटतात. त्या मुलांचे प्रवेश पतंगरावांनी कोणत्याही डोनेशनशिवाय केली आहेत.

खारघर येथील भारती विद्यापीठ संस्थेतील आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमासाठी एका गरीब विद्यार्थीनीने प्रवेश घेतला होता. मात्र ती विद्यार्थीनी सांगलीची असल्याचे कळताच त्या विद्यार्थ्यीनीची घेतलेली फी परत करण्याचे आदेश दस्तुरखुद्द पतंगरावांनीच दिल्याचे कराडमधील रहिवासी नितीन कळंबे यांनी सांगितले.

डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या कारकिर्दीत डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत.नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि Computer Application या संस्थांची स्थापन करून शिक्षणाबरोबरच अनेकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या.

त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” हे होत.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहीली आहे.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *