Breaking News

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा बनली मनोमिलन यात्रा विखे-थोरात, आवाडे-आवळे, कदम-पाटील मधील वाद अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मिटला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. मात्र या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या गट-तटाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मनोमिलन घडवून आणण्यात जनसंघर्ष यात्रा मनोमिलन यात्रा ठरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत याचा निश्चित फायदा होईल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या जनसंघर्ष यात्रेला कोल्हापूरातून सुरुवात करण्यात आली. यात्रेच्या पहिल्या दिवसापासून पक्षाची सर्व राज्यस्तरीय नेते सहभागी झाले. मात्र जिल्ह्यामध्ये असलेले गटा-तटाचे राजकारण सहभागी झाल्यानंतरही यात्रेत दिसून येत होते. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेत कोल्हापूरातील कलप्पा आवडे आणि आवळे यांच्या गटात असलेले राजकिय वैल मिटविण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत दोघांमध्ये असलेल्या राजकिय वैमनस्यावर तोडगा काढत या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन घडवून आणले.

या दोन नेत्याबरोबरच कोल्हापूरातील सतेज बंटी पाटील आणि पी.एन.पाटील यांच्यातील वादही असाच चव्हाण यांनी मिटविल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

याशिवाय सांगलीचे नवनिर्वाचित आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य संपुष्टात आणण्यासाठी अशोक चव्हाणांनी पुढाकार घेतला. त्यासाठी आवश्यक तो तोडगाही या दोघांमध्ये काढत आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीच्या कामाला लागण्याचे आदेश चव्हाण यांनी दोघांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

तर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळचे मित्र आणि आता एकमेकांचे कट्टर राजकिय विरोधक म्हणून ओळखले जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात हे परिचित आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या दोघांमध्ये राजकिय विस्तवही जात नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागत आहे. या यात्रेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात यात्रा आल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना एकत्रित घेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी रात्री ११ च्या सुमारास बैठक घेतली. रात्री २ वाजेपर्यंत बंद दाराआड चर्चा करत या दोन्ही नेत्यांमध्ये असलेले राजकीय शत्रुत्व बाजूला सारत मनोमिलन घडवून आणण्यात अशोक चव्हाण यांनी मनोमिलन घडवून आणले. विशेष म्हणजे या मनोमिलनामुळे राज्याच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून त्यास विखे-पाटील यांनीही पाठींबा दर्शविला असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *