Breaking News

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंना चैत्यभूमीवर जाण्यास वेळच नाही भाजपा नेते आ. भाई गिरकर यांची खंत

मुंबईः प्रतिनिधी
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास गेले नाहीत. तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून स्वतः बैठकही घेतली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यास ते गेले नसल्याची खंत व्यक्त करत त्यांचे डॉ.बाबासाहेबांविषयीचे प्रेम बेगडी असल्याची टीका भाजपा नेते विजय भाई गिरकर यांनी करत आता किमान महापरिनिर्वाणदिनाला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास जातील, अशी खोचक अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि प्रवक्ते विश्वास पाठक उपस्थित होते.
गिरकर म्हणाले की, महापरिनिर्वाणदिनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून लाखो लोक येतात. त्यांच्या व्यवस्थेसाठी गेली पाच वर्षे स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक आयोजित करत होते. देवेंद्र फडणवीस महापरिनिर्वाणदिनाला सकाळीच अभिवादन करण्यास उपस्थित राहत. त्यांच्या पुढाकाराने राज्यपालांनी त्यांच्यासोबत महापरिनिर्वाणदिनी अभिवादनाला येण्याची परंपरा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीसाठी काल मंगळवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीला केवळ मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. आपण स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री बैठकीस उपस्थित राहतील, असे आपल्याला सांगण्यात आले होते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 1978 साली चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणीही चैत्यभूमीवर अभिवादनास गेलेले नाही. किमान राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर तरी उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना मानवंदना देण्यास जातील, अशी अपेक्षा होती. पण त्यांना त्यासाठी वेळ मिळालेला नाही. चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाणदिनाला लाखोंचा समुदाय जमा होतो. त्यांच्या व्यवस्थेसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची परंपरा आहे. पण मुख्यमंत्री ठाकरे हे उपस्थितच राहीले नसल्याचे ते म्हणाले.
मुंबईत आल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बहुतेक मंत्र्यांना मात्र शपथविधी नंतर त्यासाठी वेळ मिळालेला नाही याची खंत वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *